29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या आमदाराचा ‘कोविड’ सेंटर आवारात धिंगाणा

भाजपच्या आमदाराचा ‘कोविड’ सेंटर आवारात धिंगाणा

टीम लय भारी

सातारा : भाजपचे वादग्रस्त आमदार जयकुमार गोरे यांच्या बेबंदशाहीचे नवे प्रकरण उजेडात आले आहे. ‘कोविड’ सेंटर म्हणून मान्यता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात संबंधित संस्थेच्या मूळ विश्वस्तांसोबत आमदार गोरे यांचे जोरदार वादंग झाले ( MLA Jaykumar Gore made controversy in Covid center ).

हे वादंग इतके टोकाला गेले की, दोघेही जण एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले. एकमेकांना यथेच्छ शिवीगाळ करण्यात आली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोचले. अतिरिक्त पोलीस अधिक्षक, उप अधिक्षकांना यांत हस्तक्षेप करावा लागला.

राज्यभरात ‘कोरोना’ची गंभीर परिस्थिती आहे. असे असताना चक्क कोविड सेंटरच्या आवारातच आमदार महोदयांनी दंडेलीचा प्रकार केल्याने सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.

बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्यानंतर गुन्हे दाखल करावे की करू नये यावरून रात्री १० वाजेपर्यंत पोलीस चौकीमध्ये घोळ चालू होता. पोलिस आमदारांना झुकते माप देत होते, व देशमुख कुटुंबिय व त्यांच्या समर्थकांवरच गुन्हे दाखल करण्याच्या मानसिकतेत होते. पण शेवटी हे प्रकरण मिटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

वादाचे मूळ आर्थिक व्यवहारात

सातारा जिल्ह्यातील मायणी ( ता. खटाव ) या गावामध्ये छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामार्फत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, नर्सिंग इत्यादी अभ्यासक्रम राबविले जातात. डॉ. एम. आर. देशमुख यांनी हे महाविद्यालय स्थापन केले होते.

आमदार जयकुमार गोरे यांनी वर्षभरापूर्वी हे महाविद्यालय देशमुख यांच्याकडून ‘विकत’ घेतले होते. जुन्या विश्वस्तांना साधारण ८० कोटी रुपये देण्याचा सौदा ठरला होता. परंतु गोरे यांनी जुन्या विश्वस्तांना अवघे काही लाख रूपये देवून तोंडाला पाने पुसली.

दुसऱ्या बाजूला गोरे हे संस्थेच्या अध्यक्षपदावर आरूढ झाले आहेत, तर पत्नीला त्यांनी सचिव बनविले आहे. संस्थेमध्ये असलेल्या जुन्या अनेक आजीवन सदस्यांनाही गोरे यांनी वगळून टाकले आहे.

एका बाजूला गोरे यांनी ठरलेला आर्थिक व्यवहार पूर्ण केलेला नाही. दुसऱ्या बाजूला संस्था मात्र घशात घातली. तिसऱ्या बाजूला डॉ. देशमुख यांच्यावर कर्जाचा बोझा आहे. आमदार गोरे यांनी आपल्याला गंडा घातला आहे, आणि संस्थाही घशात कोंबल्याचे जुन्या विश्वस्तांच्या उशिरा लक्षात आले.

हे सुद्धा वाचा

Lockdown4.0 : गृह राज्यमंत्री शंभुराजेंच्या जिल्ह्यातच भाजपकडून लॉकडाऊनची ऐशीतैशी, मंत्री महोदय चिडीचूप

BJP MP MLA : सोशल डिस्टन्शिंगची ऐशीतैसी, भाजप खासदार – आमदाराने शेकडो लोकांना जमा करून मदत वाटपाचा सोहळा केला

BJP MLA : भाजपचा आमदार लोकांसोबत पोहण्यात दंग, सोशल डिस्टन्शिंगच्या तिनतेरा

त्यामुळे देशमुख कुटुंबियांना कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गोरे यांनी केलेल्या फसवणुकीमुळे मानसिक त्रासात असलेल्या देशमुख कुटुंबातील एकजणाने बुधवारी अनवधानाने चुकीची औषधे खाल्ली. त्यामुळे बुधवारी वादाची ठिणगी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशमुख कुटुंबातील सदस्य हिंमत देशमुख हे गोरे यांना जाब विचारण्यासाठी महाविद्यालयात आले. परंतु प्रांगणामध्येच या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. आमदार गोरे यांची वृत्ती ही आडदांड, दादागिरीची असल्यामुळे कोणताही ‘शहाणा’ माणूस त्यांच्यासोबत सामंजस्याने चर्चा करू शकत नाही. परिणामी देशमुख व गोरे यांच्या जोरदार वादंग झाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादानेच महाविद्यालयाचा घोटाळा

या महाविद्यालयावर ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने कारवाई केली होती. न्यायालयातही प्रकरण गेले होते. महाविद्यालयाकडून सरकार २० कोटी रुपयांची वसूली करणार होते. परंतु त्यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

फडणवीस यांनी महाविद्यालयाकडून २० कोटी रुपये आकारणीकरीता सवलत दिली ( Devendra Fadnavis given fever to MLA Jaykumar Gore ). त्या बदल्यात आमदार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. गोरे यांनी एका बाजूला फडणवीस यांची सरकारी मदत घेतली, तर दुसऱ्या बाजूला जुन्या विश्वस्तांशी गोड बोलून संस्थेत घुसखोरी केली.

देवेंद्र फडणवीस यांचा आशिर्वाद मिळाल्यानेच हे महाविद्यालयात आमदार जयकुमार गोरे यांच्या घशात गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आमदार गोरे व जुन्या विश्वस्तांमधील वाद आता विकोपाला पोचल्याने फडणवीस यांच्या आशिर्वादाने झालेला हा घोटाळा आता चव्हाट्यावर आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी