नुकतेच लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशात सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया होणार असून नाशिक मध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या तयारीच्या कामांना गती देण्यात आली असून महापालिकेतील जवळपास साडेतीन हजार अधिकारी व सेवकांना निवडणूक कामासाठी घेण्यात आले आहे.
१३ मार्च २०२२ पासून नाशिक महापालिकेत < NMC > आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहे. ज्याप्रमाणे महापौर, स्थायी समिती सभापती असताना महिन्यातून एक वेळेला किमान महासभा व्हायची तर आठवड्यातून किमान एक वेळेला स्थायी समितीची सभा घेण्यात यायची. त्याच पद्धतीने प्रशासकांना तसे अधिकार असल्यामुळे विकास कामांसाठी नाशिक महापालिकेत नियमित स्थायी समितीची बैठक घेऊन विविध प्रकारच्या खर्चांना मंजुरी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महासभा घेऊन विविध विकास कामे व इतर कामांना मंजूर मिळत आहे, मात्र आता आचारसहिता सुरू झाल्यामुळे शहरातील विविध कामांवर त्याचा परिणाम होणार आहे तर दुसरीकडे आयुक्तांसह दोन्ही अतिरिक्त आयुक्त व सुमारे दीड डझन उपायुक्त दर्जाचे अधिकारी यांच्यासह सुमारे साडेतीन हजार अधिकारी व सेवकांना लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी पाचारण करण्यात आल्याने मनपाच्या इतर कामांना मोठा फटका बसणार आहे. मनपाच्या सर्व अधिकारी व सेवकांची पहिले प्रशिक्षण देखील झाली असून लवकरच दुसरे व तिसर्या टप्प्याचे प्रशिक्षण होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे, तर या सहा विधानसभा मतदारसंघात मनपा अधिकार्यांना नेमणूक मिळणार आहे.
अत्यावश्यक सेवेवर परीणाम नाही
मनपाचे साडेतीन हजार अधिकारी व सेवकांना लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी घेतले तरी मनपाच्या अत्यावश्यक सेवेवर परीणाम होणार नाही याची दक्षता घेत पाणीपुरवठा, सफाई, अग्निशामक दल व आरोग्य विभागाच्या अधिकारी व सेवकांना त्यातून सुट मिळाली आहे.
वाहने देखील जाणार
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून युध्द पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे विविध शासकीय व निमशासकीय विभागांकडून मनुष्यबळ घेण्यात येत आहे. त्याच प्रमाणे मोठी वाहने देखील गोळा करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक मनपाच्या वाहनांची देखील मागरी करण्यात आली आहे. मनपाकडे सुमारे २२ एसी वाहने असून ते देखील निवडणूक कामासाठी जाणार आहे.