नाशिक महानगरपालिकेतील चारही तरण तलावातील आजीवन सभासद रद्द करण्याचा ठराव महासभेत संमत झाला असल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच त्याचे पडसाद सातपूर तरण तलाव येथे दिसून आले. आजीव सभासदांनी या ठरावाचा निषेध व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान,जलतरण तलाव व्यवस्थापकाच्या स्पष्टीकरणानंतर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतला. जलतरण तलावांची क्षमता आणि त्याठिकाणी येणाऱ्या सभासदांची संख्या यांचा ताळमेळ बसत नसल्याने मनपा प्रशासनाने आपल्या चारही जलतरण तलावांसाठी आजीव सभासदत्व देणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून महासभेने त्यास मंजुरी दिली आहे. अशा आशयाचे वृत्त शनिवारी (दि.२) प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच त्याचे पडसाद मनपाच्या चारही जलतरण तलावांमध्ये दिसून आले.दरम्यान, मनपाच्या सातपूर येथील जलतरण तलावातील आजीव सभासदांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. भविष्यात या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, जुन्या अजीवन सभासदांचे सभासदत्व कायम असून त्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती शुक्ल भरणे आवश्यक आहे. केवळ नवीन सभासदांना एक वर्षासाठी आजीवन सभासदत्व मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण जलतरण तलावाच्या व्यवस्थापणाकडून देण्यात आले. त्यानंतर आजीवन सभासदांनी आपले आंदोलन स्थगित करत पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी दिलीप कटारे, नाना वाघ, काळू काळे, दिगंबर निगळ, ज्ञानेश्वर नहीरे, शशी दातीर, सुधाकर शिशोदे, दिलीप नेरे, शशिकांत दातीर, सुदाम खोडे, गोरख भंदुरे, समाधान चौधरी , समाधाम देवरे, दिपक मौले, संपत भंदुरे, कांतीलाल भंदुरे, संजय मटाले, प्रकाश महाजन आदीसह नागरिक उपस्थित होते.