नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत असताना वाहनसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्येने भयाण स्वरुप धारण केले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिका पोलिस यंत्रणेप्रमाणे स्वत:चा वाहतूक सेल निर्माण करणार असून त्यासाठी आवश्यक कार्यकारी अभियंत्यासह आठ पदे भरण्यास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेने मान्यता दिली. त्यामुळे लवकरच मनपाचा वाहतूक सेल कक्ष स्थापन होणार असून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होईल.
मुंबई व पुणे पाठोपाठ नाशिक शहर वेगाने वाढत आहे. शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांचा घरात पोहचली असून पुढिल काही वर्षात हा आकडा पन्नास लाखांच्या घरात पोहचेल.वाढती लोकसंख्या व विकासबरोबर येथे चारचाकी, दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. मुख्य शहरासह उपनगरांमध्येही वाहतूक कोंडीची भर पडत आहे. त्याच बरोबर पार्किंगला जागा नसल्याने शहरातील रस्तेच पार्किंग बनले आहेत. मुख्य बाजारपेठा असो की काॅलनी रस्ते वाहन पार्किंगसाठी वापरले जात आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने वाढते शहरिकरण पाहता महापालिकांनी पोलिस यंत्रणेप्रमाणे वाहतूक सेल निर्माण करावा असे आदेश दिले होते. त्याचा आधार घेत मुंबई, पुणे महापालिकांनी वाहतूक सेल हा स्वतंत्र विभाग निर्माण केला. त्यांच्या मार्फत शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन देणे, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, रस्ते वाहतूक सुरक्षा उपाय, अतिक्रमणमुक्त वाहतूक मार्ग यांसह विविध मुद्यांवर काम केले जाते. नाशिक शहराचा वेगाने होणारा विस्तार व वाहतुकीची समस्या पाहता महापालिकेने वाहतूक सेल हा विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांनी त्यास ग्रीन सिग्नल दिला असून त्यासाठी आवश्यक १ कार्यकारी अभियंता, १ उपअभियंता, २ सहायक अभियंते आणी चार कनिष्ठ अभियंते ही आवश्यक पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. लवकरच ही पदे भरली जाणार असून वाहतूक कक्ष कार्यन्वित केला जाईल. त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी फोडणे, वाहतुकीला शिस्त लावणे, अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना करणे ही कामे वाहतूक सेल मार्फत केली जातील.
सिंहस्थापुर्वी मार्गी लागणार
दोन वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून कोट्यवधी भाविक, पर्यटक भेट देणार आहेत. त्यावेळी गर्दिसह वाहतूक कोंडि सोडवणे हे मुख्य आव्हान ठरेल. त्यापुर्वी वाहतूक सेल सुरु करण्याचा मनपाचा मानस आहे.
आयुक्तांनी वाहतूक सेल कार्यन्वित करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असून त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांसह आठ पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच भरती करुन हा विभाग सुरु केला जाईल.
– लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, मनपा