31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुढीपाडव्याला नाशिक मध्ये कोट्यवधीची उलाढाल

गुढीपाडव्याला नाशिक मध्ये कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत अपार उत्साह बघावयास मिळाला. सोने-चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जात असलेल्या या दिवशी नाशिककरांनी दरवाढीनंतरही खरेदीचा आनंद घेतला. चारचाकी, दुचाकी, घरे, इलेक्ट्राॅनिक वस्तू तसेच फर्निचर खरेदीचीही नाशिककरांनी मुहूर्तमेढ रोवल्याचे दिसून आले.
गुढीपाडवा (Gudi Padwa) खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्याने विविध कंपन्या व विक्रेत्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचा नाशिककरांनी चांगलाच लाभ घेतल्याचे दिसून आले. सोने-चांदी खरेदीसाठी सायंकाळनंतर नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांत अचानकच सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याने, त्याचा खरेदीवर परिणाम होईल असा अंदाज वर्तविला जात होता.(Crores of rupees in Nashik on Gudi Padwa )

परंतु, ग्राहकांचा प्रतिसाद बघता मोठी उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. विशेषत: चोख सोने खरेदीला अधिक प्राधान्य दिले गेले. गुंतवणूक म्हणूनदेखील अनेकांनी सोने-चांदी खरेदी केली.मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी प्रवेशद्वाराला झेंडू व आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्यात आले होते. त्याचबरोबर दारासमोर सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळी नवे कपडे परिधान करुन पारंपरिक पध्दतीने घरोघरी गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. वर्षातला पहिलाच सण असल्यामुळे घरोघरी गुढीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता. या दिवशी कडूनिंबाची पाने, साखर व गूळ खाण्याची पध्दत आहे. नागरिकांनी घरोघरी जाऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
वाहन बाजारातही मोठी तेजी दिसून आली. अनेक चारचाकी वाहनांना वेटिंग असल्याने, ग्राहकांनी अगोदरच बुकिंग केल्या होत्या. अंदाजे ८०० पेक्षा अधिक कारची बुकिंग आणि डीलिव्हरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. . तर तीन हजार पेक्षा जास्त दुचाकींची विक्री झाली. घरे विक्रीदेखील समाधानकारक झाल्याने रिअल इस्टेटला बूस्ट मिळाला. बांधकाम व्यावसायिकांच्या मते, शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लॅट, रो-हाऊसेस तसेच बंगलोजची विक्री झाली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात बुकिंगसाठी ग्राहकांची झुंबड पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर मोबाइल शॉपी, इलेक्ट्रॉनिक मॉल्समध्ये अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल, मायक्रोव्हेव, ओव्हन , फर्निचर गुढीपाढव्याच्या मुहूर्तावरच घरी नेण्याचा ग्राहकांचा कल दिसून आला.

चांगला रिस्पॉन्स आहे .६ आणि ७ एप्रिल रोजी क्रेडाईचे शहरात प्रॉपर्टी प्रदर्शन झाले होते. त्याला भेट दिलेल्या अनेक नागरिकांनी गुढीपाड्व्याच्या मुहुर्तवार प्रकल्पाला भेट देत फ्लॅट, प्रॉपर्टी बुकिंग केली. गुंतवणुकीसाठी प्लॉट मध्ये देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली.
कुणाल पाटील, अद्यक्ष , क्रेडाई नाशिक मेट्रो

लोकांमध्ये सोने खरेदीसाठी मोठा उत्साह आहे. आज ७२ हजार रुपये प्रतितोळा दर असला तरी सोने दर ७५ हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळ गुंतवणुकीसाठी देखील आज मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात आली.
राजेंद्र ओढेकर, सराफ व्यावसायिक ,नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी