महापालिकेने शहरात होर्डिंग्ज निविदा राबविण्यापुर्वी जागांसाठी शोध मोहीम सुरुवात केली असून उद्यान विभागाने जाॅगिंग ट्रॅक व उद्याने अशी एकूण प्राईम लोकेशनवरची तीस ठिकाणे होर्डिंग्जसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. वरील ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असल्याने या जागांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. तसेच मनपाच्या उत्पन्नातही कोट्यवधीचा भर पडेल.तसा प्रस्ताव उद्यान विभाग < Parks department >आयुक्तांना देणार आहे.मनपा जागेतील होर्डिंग निविदेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने केला होता. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला २८ ठिकाणी होर्डिंगसाठी जागा देण्यात आली होती. मात्र या कंपनीने मनपा मालकीच्या वापरात असलेल्या, वापरात नसलेल्या खुल्या जागा, पदपथ, इमारती, उद्याने, वाहतूक बेटे, रस्त्यामधील दुभाजक यात मोठ मोठ्या होर्डिंग उभे केले.(Jogging track, park to feature hoardings:Parks department to provide space)
त्यामुळे मनपाचा कोट्यवधीचा महसूल बुडालाचा आरोप झाला. या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी २८ जागा वगळता शहरातील इतर जागांसाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व शहरातील प्राईम लोकेशनसह महत्वाच्या जागांचा होर्डिंग्जसाठी शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने उद्यान विभागाने जाॅगिंग ट्रॅक व काही उद्याने अशा एकूण तीस जागांचा प्रस्ताव आयुक्तांना दिला आहे. वरिल सर्व जागा प्राईम लोकेशनवर आहेत. या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे जाहिरातदार होेर्डिंग्जसाठी या जागांना पसंती देतील असा उद्यान विभागाचा अंदाज आहे.
प्रतिक्रिया
होर्डिंग्जसाठी प्राईम लोकेशनवरील उद्याने व जाॅगिंग ट्रॅक अशा तीस जागांचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला जाईल. या जागांचा समावेश केल्यास मनपाच्या उत्पन्नात कोट्यवधीचा महसूल जमा होईल.
– विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा
महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातून मनपा हद्दीतील जागांसाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढण्यात आली. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला हे टेंडर मिळाले. मात्र यातील निविदा, कार्यादेश व करारनामा यात मोठ्या प्रमाणात तफावत करण्यात आली असुन यातून कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप खासगी जागेतील जाहिरात फलक धारकांची संघटना असलेल्या नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे पत्रकार परिषदेत केला होता. मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीने हव्या तशा अटी, शर्ती घुसविण्यात आल्या. तर नको असलेल्या अटी, शर्ती काढून टाकण्यात आल्या. तर काहींमध्ये सोयीस्कररित्या बदल करण्यात आला. नाशिक शहरात कुठेही, कसेही, कोणत्याही ठिकाणी जाहिरात फलक लावण्याचे अधिकारी मक्तेदारास देण्यात आले. यात मनपा मालकीच्या वापरात असलेल्या, वापरात नसलेल्या खुल्या जागा, पदपथ, इमारती, उद्याने, वाहतूक बेटे, रस्त्यामधील दुभाजक यात मोठ मोठ्या होर्डिंग उभे करण्याची मुभा देण्यात आली. सदरची निविदा ही फक्त २८ होर्डिंगसाठी देण्यात आली होती. तसेच आदेश देखील २८ होर्डिंगचाच देण्यात आला. मात्र आज सुमारे ६३ हून अधिक होर्डिंग उभे आहेत. यापैकी फक्त २८ होर्डिंगचेच भाडे महानगरपालिकेस मिळत आहे आणि बाकीच्या होर्डिंगची कुठलीही आर्थिक नोंद अथवा भाडे महापालिकेमध्ये भरत नसल्याचे आढळून येत नसल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला होता. त्यानंतर आयुक्तांनी या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीने आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. हा अहवालाचा निष्कर्ष समोर येयचा असला तरी त्या पुर्वीच आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आहेत. येत्या २८ मार्चला पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला दहा वर्षासाठी दिलेला ठेका रद्द केला जाणार असून नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
जाहिरात स्पाॅटसाठी जागा शोधणार
मुंबई, ठाणे या महापालिकांना जाहिरात फलकातून कोट्यवधीचा महसूल मिळतो. नाशिक शहरही वेगाने विस्तारत असून नवीन निविदेत अशा जाहिरात स्पाॅटसाठी नवनव्या जागांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात जाहिरात फलकातून भरघोस वाढ होईल.
प्रतिक्रिया
मनपा प्रशासन येत्या२८ मार्चला जाहिरातीचा दिलेला ठेका रद्द करणार आहे. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
– डाॅ.अशोक करंजकर, आयुक्त मनपा