26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपात चर खोदणे सर्वेक्षण नोविदेला मुदतवाढ

नाशिक मनपात चर खोदणे सर्वेक्षण नोविदेला मुदतवाढ

शहराला पाणी कपातीला समोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षणासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र त्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवल्याने या निविदेला सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरासाठी हा महत्वाचा विषय असून सर्वेक्षणाला जेवढा उशीर होईल तेवढा पुढे चर खोदण्यास विलंब होईल व नाशिककरांवरील पाणी कपातीचे ढग आणखी गडद होतील.मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण जेमतेम ४९ टक्के भरल्याने नाशिकमधील गंगापूर व दारणा समूहातून एकूण तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. परिणामी महापालिकेने जलसंपदाकडे मागणी केलेले ६३०० दलघफू पाणी आरक्षण फेटाळण्यात आले.

मनपाला ५३०० दलघफू पाणी देण्यात आले. शहराची ३१ जुलैपर्यंत तहान भागविण्यासाठी ५८०० दलघफू पाणी गरज अाहे. त्यामुळे मागणीच्या पाचशे दलघफू पाण्याचा तुटवडा आहे. मनपाच्या मागणीनूसार जलसंपदाने गंगापूर धरणातील सहाशे दलघफू पाणी वापरण्याची मनपास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरावरील पाणी कपात टळू शकते. परंतू धरणाची पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागेल. अन्यथा मृतसाठ्यातील पाणी उचलता येणार नाही व शहरात पाणी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने चर खोदण्याच्या हालचाली सुरु केल्या. पहिल्या टप्प्यात चर खोदण्यापुर्वी तेथे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी सात दिवसांपुर्वी निविदा प्रसिध्द करण्यात आली. परंतू त्याकडे या क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे मनपाची डोकेदुखी वाढली आहे. या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्चअखेर पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करुन एप्रिलपर्यंत धरणात चर खोदण्याचे काम हाती घ्यावे लागेल.

वीस दिवसांचा पाणी तुटवडा
पालकंमत्री भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी टंचाई बैठकीत महापालिकेने ३१ जुलैपर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी वीस दिवसांचा पाणी तुटवडा असल्याचे सांगितले होते. मात्र चर खोदून त्यातून सहाशे दलघफू पाणी उचलल्यास हा तुटवडा राहणार नाही व पाणी कपातीची गरज भासणार नाही, असा दावा केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी