31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रCoronaeffect : निवडणुका आल्या की मते द्यायला आणता, मग आता दुर्लक्ष का?...

Coronaeffect : निवडणुका आल्या की मते द्यायला आणता, मग आता दुर्लक्ष का? कोरोनामुळे अडकलेल्या कामगारांसाठी सदाभाऊंचा आंदोलनाचा इशारा

टीम लय भारी

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह राज्याच्या विविध भागातील कष्टकरी भूमीपुत्र गेले दोन महिने मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या विविध शहरांमध्ये अडकले आहेत. विविध टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रातून ते टाहो फोडून ते आपल्याला गावी जायचे आहे अशी हाक मारताहेत. पण जगभरातून लोकांची आणण्याची सोय करताना आपल्याच राज्यातील भुमिपुत्राकडे दुर्लक्ष केले आहे. या राज्यातील कष्टकरी भुमिपुत्र आणि मजुरांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा धारण केला आहे. या मजुरांना गावात प्रवेश देण्यास विरोध करणा-या लोकप्रतिनिधींचाही त्यांनी समाचार घेतला. मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारने त्वरित करावी, अशा सूचनाही सदाभाऊ खोत यांनी केल्या आहेत.

निवडणुकीत मतदानासाठी या कामगारांना स्वत:च्या खर्चाने बस करुन गावात आणण्यात सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात. हे कामगार तुमचा जयजयकार करण्यासाठी तेव्हा चालतात. मग अशा आपत्तीच्या काळात या मजुरांना त्यांच्या गावात विरोध का करता, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही या कामगारांना, मजुरांना वा-यावर सोडणार नाही. यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा आंदोलन करु, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

लॉकडाऊनमुळे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात अनेक ठिकाणी राज्यातील मजूर, कामगार अडकले आहेत. त्यांच्या जवळील पैसा आणि अन्नधान्य संपले आहे. अशाही परिस्थितीत ते हजारो मैल पायपीट करत आहे. सरकार देशातील नागरिकांना परदेशातून विमानाने मायदेशात आणत आहे. तर राज्यातील परप्रांतीयांना रेल्वे आणि बसने पाठवत आहे. मग राज्यातील मजुरांना, कामगारांना ही सवतीची भूमिका का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी. अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल, अशी भीती खोत यांनी व्यक्त केली. गावागावात पोहचलेले भूमिपुत्र गावाला पारखे झाले असून ते गावाबाहेर झोपडी तयार करुन रहात आहेत. गुरांच्या गोठ्यात काहीजण रहातात. हे सर्व मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्यासोबत महिलाही आहेत. त्यांची आंघोळीची आणि प्रात:विधीसाठी सरकारने कोणतीही सोय केलेली नाही. उघड्यावरच सर्व विधी उरकताना यांच्यावर कोणते संकट कोसळत असेल याची कोणी कधी विचार करणार आहे का. पावसाळा तोंडावर आला आहे. तेव्हा तर परिस्थिती आणखी बिकट होईल. मजूर गावात आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारटांईन करुन ठेवा, अशी सूचना ही त्यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी