महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी पहाटे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. . वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
मनोहर जोशी याचं जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी छोट्याशा गावात झाले. त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. जेवणाची सोय महाजन नावाच्या महिलेनी केली. अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे आले. सहत्रबुध्दे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून शिक्षण सुरु ठेवले. किर्ती कॉलेजमधुन बी. ए. केले. पुढे मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. पुढे वयाच्या 27 व्या वर्षी एम.ए., एल एल.बी. केली. दरम्यान, 1964 ला अनघा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांचा एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
वयाच्या 72 व्या वर्षी ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली.2 डिसेंबर 1961 ला नोकरी सोडून कोहिनूर या नावाने क्लासेसपासून व्यवसायाला सुरुवात क्लेई. नंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा त्यामागचा उद्देश होता. आज भारतभर 70 शाखा व दरवर्षी 12 हजारपेक्षा जास्त विद्यार्थाना शिक्षण मिळत आहे. कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे.शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा देखील मोठा वाटा आहे. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिले होते. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केले आहेत.
मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास
2 वेळा नगरसेवक
3 वेळा विधानपरिषद सदस्य
मुंबई महानगरपालिका महापौर (1976 -77)
2 वेळा विधानसभा सदस्य
विरोधी पक्षनेता – विधानसभा (1990- 91)
मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य (1995-99)
केंद्रीय मंत्री (अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते)
लोकसभा अध्यक्ष (1999- 2002)
राज्यसभा खासदार (2002-2004)