33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रगायिका वैशाली माडे 'या' पक्षात प्रवेश करणार

गायिका वैशाली माडे ‘या’ पक्षात प्रवेश करणार

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्राची सुप्रसिध्द पार्श्वगायिका वैशाली माडे ही आता राजकारणात सूर लावणार आहे, म्हणजेच ती लवकरच राजकारणात प्रवेश करत आहे. वैशाली माडे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या ३१ मार्चला मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैशाली माडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येणार आहे.

वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद पटकावल्याने वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमामुळे ही वैशाली माडे प्रचंड चर्चेत होत्या. त्यांच्या या लोकप्रियतेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षविस्तारासाठी फायदा होऊ शकतो.

‘मराठी सारेगमपा’मुळे प्रकाशझोतात

वैशाली माडे हे आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायकांपैकी एक नाव आहे. आतापर्यंत वैशाली माडे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांची शीर्षक गीत गायली आहेत. २००८ मध्ये वैशाली माडे ‘झी मराठी’च्या मराठी ‘सा रे ग म प’च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या होत्या. त्यानंतर वैशाली माडे यांनी २००९ मध्ये ‘झी’च्या हिंदी ‘सा रे ग म प’च्या किताबावरही आपले नाव कोरले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी