30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रThackeray Government : उद्धव ठाकरेंच्या घोषणा हवेतच विरणार! शेतक-यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणे...

Thackeray Government : उद्धव ठाकरेंच्या घोषणा हवेतच विरणार! शेतक-यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणे अवघड

टीम लय भारी

मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसान भरपाईसाठी महाविकास आघाडी सरकारने (Thackeray Government) १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. ही मदत दिवाळीपूर्वी संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केले होते. मात्र अर्थ विभागाच्य अधिका-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी किती मोठी आश्वासने दिली असली तरी दिवाळीपूर्वी शेतक-यांना मदत मिळणे अशक्य असल्याचे दिसते.

अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना दिला होता. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता कधी मिळते यावर मदतवाटप अवलंबून आहे. यामुळे शेतक-यांना मदतीचा हात देण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त चुकण्याची चिन्हे आहेत, असे मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, त्याबाबतची आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक आहे. शनिवारपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानी मदत वाटपासाठी संमती मिळाली नव्हती. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून, आयोगाची मान्यता लवकरच मिळेल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम अजून सुरूच आहेत, असे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले. धनत्रयोदशी येत्या शुक्रवारी आहे. १३ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. राज्य सरकारच्या हाती केवळ चार दिवसांचा वेळ आहे.

अतिवृष्टीचा सर्वात अधिक फटका मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यांना बसला आहे. राज्यात एक कोटी ३७ लाख एकूण खातेदार शेतकरी आहेत. यापैकी सुमारे ३४ लाख खातेदार शेतक-यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे. हे काही चार दिवसांत शक्य नाही, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांची दिवाळी कोरडी जाण्याची दाट शक्यता असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून कळते.

जिरायत आणि बागायत शेतक-यांना प्रती हेक्टर १० हजार (दोन हेक्टर कमाल मर्यादा) तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार (दोन हेक्टर कमाल मर्यादा) नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी साडेचार ते पाच हजार कोटी रुपये लागतील. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी आणखी तितकाच निधी लागण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत काय घडामोडी होतात यावर दिवाळीच्या आत शेतक-यांच्या हातात मदत पडणे अवलंबून असल्याचे दिसते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी