32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपवारांनी २४ तासांत भूमिका बदलली, असे कोणते गुपित अनिल देशमुखांकडे?

पवारांनी २४ तासांत भूमिका बदलली, असे कोणते गुपित अनिल देशमुखांकडे?

टीम लय भारी

मुंबई :-  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता थेट  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर मोठमोठे खुलासे होत आहेत. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कालपर्यंत म्हणत होते की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज पवार म्हणतात, की राजीनाम्याची गरज नाही. याचा अर्थ २४ तासांत अनिल देशमुख यांनी असे काय सांगितले, त्यांच्याकडे असे काय गुपित आहे, की शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली?” असा सवाल भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी विचारला आहे.

“मुख्यमंत्री का गप्प आहेत?”

 “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ फेबुवारीला पत्रकार परिषद घेतली आणि त्याचे पुरावे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर उपलब्ध आहेत. या गोष्टीचा विपर्यास करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर का बोलत नाहीत? कालपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते. आता मुख्यमंत्री का गप्प आहेत?” असा प्रश्न ही कोटक यांनी विचारला आहे.

 “गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी”

“या आधीच्या पोलिस महासंचालकांनी पत्र दिले होते की, बदल्यामध्ये कसा भ्रष्टाचार होतो. आता माजी पोलीस आयुक्त वसुलीची माहिती पत्राद्वारे देतात. इथे तर थेट आरोप गृहमंत्र्यांवर आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री जर त्यांना वाचवत असतील तर ते योग्य नाही” असे ही मनोज कोटक म्हणाले.

 “ज्युलिओ रिबेरो चौकशी कशी करू शकतील?”

“अनिल देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे. पण ही चौकशी केंद्रीय यंत्रणा किंवा न्यायाधीशामार्फत व्हावी. ज्युलिओ रिबेरो हे माजी पोलीस अधिकारी आहेत, ते पोलीस दलात होते. ते गृहमंत्र्यांची चौकशी कशी करू शकतील?” असा प्रतिप्रश्न मनोज कोटक यांनी विचारला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी