केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२४ साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची मागणी नोकरदार वर्गाकडून मागील काही दिवसांपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वर्गांतील लोकांना विशेषतः नोकरदार वर्गाला खुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने विविध करांबाबत आता चर्चेला सुरुवात झाली आहे. पण जगात राज्यकर्त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींवर कर लावले आहेत हे ऐकाल, तर तुम्हीदेखील चक्रावून जाल. (Budjet 2023 : Tax on Sex from Breast Cover to soul) मोगलांनी मुस्लिमेतर जनतेवर लादलेल्या जिझिया कराबाबत आपण सर्वच जण जाणून आहोत. पण कोणाच्या आत्म्यावरही कर लावल्याचे आपण कधी ऐकले आहे का? इतकेच नाही अहो, स्त्रियांना स्वतःचे स्तन झाकण्यासही मनाई करण्यात आली होती. त्यावर कर लावण्यात आला होता. आणि हा कोणत्या दक्षिण आफ्रिकेतील कायदा नव्हता, तर भारतात हा कायदा लागू होता. सरकारच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ‘सेक्स’वरही कर लावण्यात आला होता.
स्त्रियांना स्तन झाकण्यासाठी द्यावा लागत होता कर

स्त्रियांना आपले वक्ष स्थळ (Breast) झाकण्यासाठीदेखील राजाला कर द्यावा लागत होता. ही विकृत करपद्धती दक्षिण आफ्रिकेसारख्या कोणत्या मागास देशात अस्तित्वात नव्हती तर पाच हजार वर्षांची संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात ही करपद्धत लागू होती. केरळमधील त्रावणकोरच्या राजाने खालच्या जातीतील महिलांना स्तन झाकण्यासाठी कर लावला होता. एजवा, थिया, नाडर तसेच दलित समुदायातील स्त्रियांना त्याचे स्तन झाकण्यास मनाई होती. या समुदायातील महिलांनी जर का त्यांचे वक्ष स्थळ झाकले तर त्यांना राजाला कर द्यावा लागत होता. पण या विकृत कर पद्धतीवर नंगेली नावाच्या एका महिलेने आवाज उठवला. तिने राजाच्या या अन्यायाविरोधात बंडखोरी केली. हे कर द्यायला तिने ठाम नकार दिला. ज्यावेळी एक राजाचा कर वसुली करणारा अधिकारी तिच्या घरी कर वसुलीसाठी गेला त्यावेळी तिने नकार दिला. या प्रथेविरोधात तिने आपले स्तन कापून टाकले. परिणामी अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर या कारपद्धतीविरोधात लोकांमधून दबाव वाढत गेल्यामुळे राजाला हा कर बंद करावा लागला.
आत्म्यावरही कर

आत्मा खरोखरच असतो का याबाबत मतमतांतरे असली तरी रशियामध्ये १७१८ साली ‘पीटर द ग्रेट’ने (Peter the Great) आत्म्यावर कर लावला होता. आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास असलेल्या लोकांना हा कर द्यावा लागत होता. पण ज्या लोकांचा या गोष्टींवर विश्वास नव्हता त्या लोकांनाही हा कर द्यावा लागत होता. त्यांच्याकडून धर्मावर आस्था ठेवत नसल्याचे कारण पुढे करत कर वसूल केला जात होता. त्यामुळे आत्म्यावर विश्वास असो अथवा नसो प्रत्येकाला हा कर द्यावा लागत होता. जर कर वसुलीच्या वेळी करदाता घरी हजर नसेल तर शेजाऱ्याकडून कर वसूल केला जायचा. केवळ चर्च आणि प्रतिष्ठित लोकांना या करातून सूट देण्यात आली होती.
देहविक्रीतून मिळतो ८ कोटी ८५ लाखांचा कर

१९७१ मध्ये अमेरिकेतील रोड आयलंडची आर्थिक स्थिती अगदीच खालावली होती. तेव्हा आर्थिक परिस्थितीत सुधार घडवून आणण्यासाठी डेमोक्रेटिक स्टेट लेजिस्टेटर बर्नार्ड ग्लैडस्टोन यांनी त्या प्रांतातील प्रत्येक संभोगावर दोन डॉलरचा कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता.पण तो प्रस्ताव काही अमलात आणण्यात आला नाही. पण जर्मनीमध्ये २००४ साली एक कायदा करण्यात आला. या कायद्याअंतर्गत वेश्यावृत्तीत (Prostitutions) असलेल्या प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५० युरो कर द्यावा लागतो. जर्मनीमध्ये वेश्यावृत्तीला कायदेशीर मान्यता आहे. परंतु त्यासाठी सरकारला कर अदा करावा लागतो. बॉन या शहरात देहविक्री करणाऱ्या स्त्रियांना दर दिवशी ६ युरो कर द्यावा लागतो. देहविक्रीतून जर्मनीच्या सरकारला तब्बल १० लाख युरोंचा (सुमारे ८ कोटी ८५ लाख रुपये) महसूल मिळतो.
लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी अविवाहितांवर कर

रोममध्ये नवव्या शतकात अविवाहित तरुणांना कर द्यावा लागत होता. लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रोमचा सम्राट ऑगस्ट याने हा कर जनतेवर लादला होता. पण नवल म्हणजे ज्या विवाहित जोडप्यांना अपत्य नव्हती त्यांनादेखील हा कर द्यावा लागत होता. हा कर २० ते ६० वयोगटातील स्त्री-पुरुषांना द्यावा लागत होता. इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यानेदेखील १९२४ मध्ये ‘बॅचलर टॅक्स’ लावला होता. हा कर २१ ते ५० वयोगटातील स्त्री-पुरुषांना द्यावा लागत होता
हे सुद्धा वाचा
शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात भाजप नेत्याने उपसले आंदोलनाचे हत्यार !