34 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
HomeमुंबईCorona : तर सोमवारपासून बेस्टही बंद?

Corona : तर सोमवारपासून बेस्टही बंद?

टीम लय भारी

मुंबई : बेस्ट (BEST) कर्मचा-यांमध्ये कोरोना संसर्गाचा (Coronavirus) धोका वाढला असून आतापर्यंत ९५ जण कोरोनाबाधित असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कर्मचा-यांमध्ये सुरक्षेसाठी आवश्यक मागण्या मान्य न केल्यास सोमवारपासून बेस्ट कर्मचारी घरीच राहतील, असा इशारा बेस्ट संयुक्त कृती समितीने दिला आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर शहरात संपूर्णत: लॉकडाउन करण्यात आले. मात्र आरोग्य, सुरक्षा, आपत्कालीन अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना बेस्टच्या वाहतूक विभागामुळे दररोज कार्यालयात पोहचणे शक्य होते. परंतु, जीवाचा धोका पत्करून कामावर येणा-या बेस्टच्या वाहतूक आणि विद्युत विभागातील कर्मचा-यांच्या आरोग्याकडे पालिका आणि बेस्ट प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

बेस्ट उपक्रमातील ६० टक्के कामगार, कर्मचारी मुंबई हद्दीच्या बाहेर राहतात. त्यांना कामावर पोहोचण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत. काही कर्मचा-यांच्या इमारती, वस्ती सील झाल्याने ते अडकून पडले आहेत. मात्र त्यांची गैरसोय समजून घेतली जात नाही.

त्यामुळे कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास बेस्ट कामगार, कर्मचारी येत्या सोमवारपासून १०० टक्के लॉकडाउन पाळून उत्तर देतील, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.

बेस्ट कामगारांच्या काही प्रमुख मागण्या

 

प्रत्येक बेस्ट कामगाराची कोरोना चाचणी दररोज बस आगारातील वैद्यकीय अधिका-यांमार्फत केली जावी.

मास्क, सॅनिटायझर इत्यादी सुरक्षा साधणे त्वरित पुरवण्यात यावी.

बाधित व कोरोनाची लक्षणे असलेल्या बेस्ट कर्मचा-यांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे.

कोरोनाची लक्षणे दिसून न येणा-या परंतु बाधित असलेल्या कर्मचा-यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करावे.

एखादा कर्मचारी बाधित झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सहका-यासाठी विलगीकरण प्रक्रिया राबवावी.

कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि कोरोना बाधित होऊन मृत्यूमुखी पडलेल्या बेस्ट कर्मचारी, तसेत इतर आस्थापनातील कर्मचारी व पोलीस यांना शहीद दर्जा देऊन इतर सवलती द्याव्या.

कर्मचा-यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार देणे.

कर्मचारी व कुटुंबियांना एक कोटीचे विमा संरक्षण, कर्मचा-यांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बस सेवा उपलब्ध करून द्यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी