30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeमुंबईMNS : दीनानाथ नाट्यगृहातील डागडुजीच्या कामात १६ कोटींचा भ्रष्टाचार : अमेय खोपकर

MNS : दीनानाथ नाट्यगृहातील डागडुजीच्या कामात १६ कोटींचा भ्रष्टाचार : अमेय खोपकर

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले येथे असलेल्या प्रसिद्ध दीनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) करण्यात आला आहे. दीनानाथ नाट्यगृह हे मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असून या नाट्यगृहाच्या डागडुजीच्या कामात तब्बल १६ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितलं.

अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तसंच दीनानाथ नाट्यगृहातील काही फोटोही त्यासोबत शेअर केले आहेत. ‘मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांपूर्वी तब्बल सोळा कोटी रुपये खर्च करुन डागडुजी केलेल्या दीनानाथ नाट्यगृहाची अवस्था पाहा. नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिका-यांनी प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन याचा आढावा घेतला. ‘पुन:श्च हरीओम’ म्हणून नाट्यप्रयोगांना परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन करायचं की नाट्यगृहांची दूरवस्था बघून दूषणं द्यायची? जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने जेव्हा नाट्यगृहांची पाहणी सुरु केली तेव्हा त्यांना धक्काच बसला,’ असं अमेय खोपकर यांनी नमूद केलं आहे.

‘विलेपार्ले येथीस दीनानाथ नाट्यगृहात प्रसाधनगृहांची अवस्था इतकी वाईट असेल तर तिथे प्रेक्षकांनी का यावं? कोरोनाकाळात स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवं, पण इथे तर सगळा उफराटा कारभार आहे. केवळ पाचच वर्षांपूर्वी सोळा कोटी रुपये खर्च करुन डागडुजीच्या नावाखाली महापालिकेने नेमके कुणाचे खिसे गरम केले होते?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.

‘सोळा कोटी रुपयात खरंतर अद्ययावत नवीन नाट्यगृह बांधून झालं असतं आणि इथे डागडुजीसाठी सोळा कोटी रुपये खर्च करुनही तकलादू काम करुन ठेवलेलं आहे. सध्या सुरु असलेल्या या कामासाठी शहा नावाचा सुपरवायझर बसवला आहे. सध्याचं काम कधी सुरु होणार आणि कधी संपणार हेसुद्धा त्याला माहिती नाही. असं असेल तर मग कलाकारांच्या पाठीशी उभं राहण्याचं ‘नाटक’ सरकार कशाला करतंय? अशा वास्तूत नाट्यप्रयोगांना परवानगी देऊन सरकार काय साध्य करु पाहतंय? नाट्यव्यवसायाला पुन्हा एकदा लवकरात लवकर उभारी मिळावी, हाच आमचा उद्देश आहे,’ असंही खोपकर म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी