27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमुंबईमहात्मा फुले अभ्यासक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महात्मा फुले अभ्यासक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महात्मा फुले यांचे आभाळभर कर्तृत्व सप्रमाण/ अभ्यासपूर्ण पद्धतीने मराठी, इंग्लिशमध्ये आणणारे, नव्हे तर फुले, आंबेडकर आदी महापुरुषांवर संशोधनात्मक लिखाण करणारे, महामानवांच्या विचारांचा जागर करत देशपातळीवर फिरणारे; महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईत निधन झाले. एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नामदार छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अभिजात मराठी, आरक्षण, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, शिक्षण, समाजशोध आदी विविध विषयांवरही हरी नरके यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी आतापर्यंत ५४ पुस्तकांचे लेखन आणि संपादन केलं आहे.

.… आणि फुले चरित्र एका दिवसात संपले
९० च्या दशकात डॉ. य. दि. फडके आणि हरी नरके यांनी संपादित केलेला ८०० ते ९०० पाने असलेला ग्रंथ राज्य सरकारने प्रकाशित केला. तो एका दिवसात रांगा लावून लोकांनी खरेदी केला. त्या ग्रंथाची किंमत तेव्हा फक्त १० रूपये होती. गांगल यांनी फुले यांच्यावर टीका करण्यासाठी बेहरे यांच्या ‘सोबत’ या साप्ताहिकात दोन लेख लिहिले. त्यातील पहिला फुले यांच्यावर तर दुसरा लेख छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिला होता. नरके यांनी सप्रमाण गांगल यांचे मुद्दे खोडून काढले होते.

ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले- शरद पवार
मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले. अशा शब्दात हरी नरकेंच्या निधनानंतर शरद पवारांनी ट्वीटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले. हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली. असेही पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हे सुध्दा वाचा
दिवा स्टेशनमध्ये मोटरमनच्या केबिनमध्येच चढून महिलेनेच रोखून धरली लोकल
कोंकणीबहुल दिव्यात कोंकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबाच नाही; प्रवाशांमध्ये नाराजी
इंदुरीकर महाराजांना पुत्रप्राप्तीसंदर्भातील ‘ते’ विधान भोवणार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

ज्येष्ठ विचारवंत, माझे मार्गदर्शक प्रा. हरी नरके सरांच्या निधनाची बातमी धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! त्यांच्या निधनाने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असणारे सामाजिक व पुरोगामी चळवळीतील एक उमदं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असं ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पुरोगामी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेला एक ज्येष्ठ कार्यकर्ता आज हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कॉंग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असं ट्वीट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी