29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमुंबईPolitics : संजय राऊतांनी राज्यपालांना 'का' घातला 'कोपरापासून' दंडवत?

Politics : संजय राऊतांनी राज्यपालांना ‘का’ घातला ‘कोपरापासून’ दंडवत?

विठ्ठल एडके : टीम लय भारी

मुंबई : एकीकडे राज्यावर आलेले कोरोनाचे (Coronavirus) भीषण संकट आणि दुसरीकडे राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अघोषित तणाव असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व त्यांना ‘कोपरापासून’ दंडवत घातला. त्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सध्या राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये काही मुद्यांवरून निर्माण झालेला तणाव आणि ट्विटच्या माध्यमांतून राऊतांनी राज्यपालांना इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घातलेले दंडवत वेगळेच काहीतरी संदेश देत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी राहिले आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेऊन सहा महिनेही होत आले असताना राज्यपालांकडे उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून नियुक्ती करण्यात यावी याबाबत दोन वेळेस शिफारस करून देखील राज्यपालांनी ती फेटाळून लावली होती आणि महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात राज्यपाल महोदयांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळेच संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन धन्यवाद कोशियारी साहेब, असे तर हात जोडून म्हटले नाही ना, अशी उलटसुलट चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नाही ती 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात शिवसेना भाजपची युती होत नव्हती. मात्र काही अटी-शर्ती वर युती झाली आणि विधानसभेचे निकाल लागताच उद्धव ठाकरे यांनी भाजपने शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी अपक्षांना अप्रत्यक्ष मदत केली असा आरोप केला. या आरोपानंतर त्यांनी प्रथम अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद मागितले. मात्र 105 आमदार निवडून आलेल्या भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास स्पष्ट नकार दिला. याच दरम्यान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी शपथ घेतली. मात्र बहुमताचा आकडा पार करता येत नसल्याचे लक्षात येताच राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्याच्या दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती राजवट हटवून सकाळी सहाच्या सुमारास देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी राज्यपाल कोश्यारी होते. राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या वेळी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी यांना एक प्रकारे दुजाभावाची वागणूक दिल्याचे स्पष्ट जाणवत होते. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवार यांची समजूत काढून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे महा विकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. याचदरम्यान महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातच राज्यपाल नियुक्त दोन जागांसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून नियुक्ती करण्यात यावी याबाबत शिफारस केली होती. मात्र या दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यपालांशी कानगोष्टी करून ही शिफारस चुकीची असल्याचे सांगण्याचा हट्ट केला. त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात यावी अशी शिफारस केली. मात्र राज्यपालांनी अशी नियुक्ती करण्यास उशीर लावला आणि नियुक्ती टाळली.

यादरम्यान संजय राऊत यांनी ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’ असे ट्विट करत या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला होता.

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होऊ नयेत म्हणून शिवसेना नेते राज्यपालांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे राज्यातील रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि त्या पत्रानुसार राज्यात विधान परिषदेच्या 12 जागांसाठी निवडणूक झाली. मात्र हे पत्र लिहिण्यामागे भाजपचेच चार आमदार निवडून येणार असल्याचा फायदा होणार असल्याचे स्पष्ट कारण होते म्हणून पत्रव्यवहार केला असा आरोप राज्यपालांवर केला जातो. याच 12 विधान परिषद सदस्यांच्या निवडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून शपथविधी पूर्ण झाला.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची सूत्रे हातात घेतल्यापासून राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सहकार्याने राज्यपालांनी येनकेन मार्गाने ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांवर मात करून अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य झाले आणि ठाकरे सरकार समोरचा मोठा पेचप्रसंग सुटला. त्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट घेऊन खासदार संजय राऊत यांनी धन्यवाद राज्यपाल कोश्यारी साहेब, झाले गेले सगळे विसरुन जा, असे तर हात जोडून म्हटले नाही ना, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी