27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयजयंत पाटील यांनी सरकारची केली कानउघाडणी!

जयंत पाटील यांनी सरकारची केली कानउघाडणी!

1 जून ते 26 ऑगस्ट या काळात राज्यात सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाला आहे, कोकण वगळता राज्यात टंचाईची स्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने अनेक भागातील खरीपाची शेती संकटात आली आहे. असे असताना ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘ दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?’ अशा शब्दात कान उघाडणी केली आहे. राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.

ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात ‘सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या  हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे.
हे सुद्धा वाचा
मंत्रालयाच्या इमारतीवरुन उड्या मारुन धरणग्रस्तांचा आत्महत्येचा प्रयत्न
छगन भुजबळ हे तेलगी घोटाळ्यात तुरूंगात जाणार होते, पण शरद पवार यांनी वाचविले !
आदित्य ठाकरे महापालिकेवर प्रचंड संतापले

खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे असे पाटील म्हणाले. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल त्यांनी शेवटी उपस्थित केला आहे.

राज्यातील सरकार विरोधात वातावरण असताना ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. पण या कार्यक्रमाच्या गाजावाजामुळे अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम काही होत नाही. जूनमध्ये आलेल्या जोरदार पावसाने विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. असे असताना आता राज्यात सरकारची सामन्यांच्या मनातून पत घसरत असतानाच, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून शिंदे-फडणवीस – पवार सरकार मतदारांपर्यंत जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी