वादग्रस्त सोशल इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेने (Ketki Chitale) यावेळी फडणवीस बाईंना चिमटा काढला आहे. “आता स्वतःला बदलायची वेळ आली आहे,” असा सल्ला केतकीने अनावश्यक वक्तव्ये करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने अडचणीत आणणाऱ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नव्या भारताचे राष्ट्रपिता ठरवू पाहण्यावरून नेटकरी त्यांची चांगलीच खेचत आहेत. आता त्यात केतकी चितळेची भर पडली आहे.
अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका या संस्थेतर्फे अभिरूप न्यायालय भरविण्यात आले होते. त्यात अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना नव्या भारताचे राष्ट्रपिता ठरविले होते. फडणवीस बाई म्हणाल्या होत्या, “आपल्या देशाला तसे दोन राष्ट्रपिता आहेत. एक जुन्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आणि नवीन भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी हे आहेत.” बिनधास्त आणि बेधडक भूमिका व्यक्त करणाऱ्या केतकी चितळेने आता इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून फडणवीस बाईंना टोमणा लगावला आहे.
केतकी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते, “जुने आणि नवे गुरु तसेच जुने आणि नवीन राष्ट्रपिता हा वाद आता आऊटडेटेड होत चालला आहे. प्रत्येक सेकंदाला आपला देश बदलतोय. त्यामुळे आता आपल्याला स्वत:लाही बदलायची वेळी आली आहे. तीन हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या आता फक्त 100 वर्षेच झाली आहे, हे सत्य आपण स्वीकाणार की नाही?” या स्टोरीच्या समारोपात केतकीने, “जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय,” अशा घोषणा दिल्या आहेत. जागो मेरे देश, असे आवाहनही तिने हॅशटॅग आणि तिरंगा झेंड्याच्या स्मायलीसह केले आहे.

“स्वातंत्र्य लढ्यातील कुत्रे”
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आज “सामना”मधील रोखठोक सदरातून फडणवीस बाईंचे कान टोचले आहेत. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कुत्रेही मेले नाही, त्यांना सौ. अमृता फडणवीस नव्या भारताचे राष्ट्रपिता बनवू पाहत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी निर्भय होते. मात्र, सौ. फडणवीस यांचा नवा राष्ट्रपिता लोकांना का घाबरतो? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. “स्वातंत्र्य लढ्यातील कुत्रे व नव्या भारताचे राष्ट्रपिता; भाजपला नक्की काय हवे?” असे राऊत यांच्या लेखाचे शीर्षक आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान असणारी मंडळी आणि त्यांचे वारसदार नेहमीच भाजप व संघाच्या मंडळींच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित करीत असतात. त्या काळात संघ-भाजपाने ब्रिटिश हस्तक म्हणून काम करत आपल्याच देशबांधवांना पकडून दिले, असे आरोप होतात. त्या पार्श्वभूमीवर, राऊत यांनी निर्देश केलेल्या “स्वातंत्र्य लढ्यातील कुत्रे” या विधानाचा वेगळा अर्थ काढला जाऊ लागला आहे.