मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. जरांगे पाटील यांनीही आरक्षणासंबंधी भूमिका सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचेच सहकारी राहिलेले अजय बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर बेछूट आरोप केलेले आहे. त्यातून जरांगे पाटलांना अक्कल नाही, असं म्हणणारे हे बारसकर नेमके आहेत तरी कोण, हेच जाणून घेऊया…
- अजय महाराज बारसकर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील बालगावचे आहेत. एका वारकरी मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. त्यांचं वय 45 वर्षे असून, बीएपर्यंतच त्यांचं शिक्षण झालं असून त्यांनी नगरच्या विखे पाटील कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही केला आहे. तसचे अहमदनगरच्याच CSRD कॉलेजमधून पत्रकारितेचा डिप्लोमाही केला आहे.
- बारसकर राजकारणात येऊ इच्छितात, हे स्पष्ट आहे. कारण 2014 मध्ये अभिनेत्री आणि राजकारणी दिपाली सय्यद यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही त्यांनीही लढवली होती. यावेळी त्यांना सहाव्या क्रमांकाची मतं मिळाली होती. ‘बहुजन मुक्ती पार्टी’ या पक्षाकडून ही निवडणूक लढवणाऱ्या बारसकरांना 6003 इतकी मत मिळाली होती. त्यांच्यावर पाचव्या क्रमांकावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांना 7120 इतकी मतं मिळाली होती. त्यावेळी दिपाली सय्यद यांना आम आदमी पार्टीनं उमेदवारी दिली होती.
- त्यानंतर बारसकर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटना या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्षही राहिले. पण ज्यावेळी बारसकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.
- अजय बारसकर हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनातही सहभागी होते. आंदोलनातील जरांगेंचे जवळचे सहकारी म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. बारसकर जरांगेंसोबत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चेवेळीही ते उपस्थित होते आणि 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.
- प्रवकचनकार, लेखक यांसह शाहीर, कवी, व्याख्याते, प्रबोधनकार, शिक्षक, कायद्याचे अभ्यासक म्हणून अजय बारसकरांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत 10 पुस्तकं लिहिली आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधीत ‘तुका सेज’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तकही बारसकरांनी लिहिले आहे. अजय बारसकर यांनी सन 2018 मध्ये देहू इथल्या भंडारा डोंगर इथं संत तुकाराम ज्ञानपीठ संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा, संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतात.
हेही वाचा : अभिनेता किरण मानेंची पोस्ट, तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही