29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही, सरकार स्थापनेचा निर्णय दोन दिवसांत होणार :...

राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही, सरकार स्थापनेचा निर्णय दोन दिवसांत होणार : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसने अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. उगीचच अफवा पसरवू नका, गोंधळ वाढवू नका. सरकार स्थापन करण्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. एक – दोन दिवसांत त्यावर निर्णय होईल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, काल काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने निर्णय घेतले आहेत. प्रमुख नेत्यांनी माझ्याशी व उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला आहे. सरकार स्थापनेबाबत पुढच्या एक – दोन दिवसांत निर्णय होईल. डिसेंबर उजाडेपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालेले असेल. आज माझी शरद पवार यांच्याशी भेट होणार आहे. कालच भेटणार होतो. पण काल दोन्ही पक्षांची बैठक बरीच लांबली. त्यामुळे आज पवार यांच्याशी माझी भेट होईल. परंतु सोनिया गांधींशी बैठक ठरलेली नाही. काँग्रेसचे प्रमुख नेते सोनिया गांधींच्या सुचनेनुसारच बैठका घेत आहेत.

संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. परंतु केवळ राजकीय दबावातून शिवसेनेच्या तिन्ही खासदारांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. सभापती व्यंकय्या नायडू यांना मी पक्षातर्फे पत्र लिहिले आहे.

– खासदार संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्या भेटीविषयी विचारले असता, राऊत म्हणाले की, हिंदुस्थानच्या पंतप्रधानांना भेटणे यांत काहीच विशेष नाही. संसदेचे अधिवेशन चालू आहे. शरद पवार शेतकरी नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन पवार हे पंतप्रधानांना भेटले असतील तर त्यात काहीच गैर नाही. अमित शाह यांनी शरद पवारांशी संपर्क केला असेल तर मला माहित नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या हिंदूत्ववादी धोरणाबद्दल काँग्रेसला आक्षेप आहे असे विचारले असता राऊत म्हणाले की, आपला देश आणि देशाची राज्य घटना धर्मनिरपेक्ष तत्वांवर आधारित आहे. एकदा हे मान्य केले की, अन्य मुद्दे महत्वाचे राहात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केले होते. शिवाजी महाराजांना सगळ्या धर्माचे लोक मानायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा न्यायालयात गीता, बायबल, कुराणाऐवजी संविधानाची शपथ घेण्याची मागणी केली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी