‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्रजी पवार’ गटाला निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीचे चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाकडून या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावरुन करण्यात आले. तुतारी या चिन्हावरून विरोधकांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली. आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनीदेखील शरद पवार गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला”, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.
शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी या चिन्हावरून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ठाकरे म्हणाले, “तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. मी मागेही यावर बोललो आहे. फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली.”
राज ठाकरे यांनी एक आठवण सांगताना म्हणाले की, पुण्यात काही दिवसांपूर्वी 100 व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात काही राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले, मी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विचारलं कोणत्या गटाचे? तेव्हा दोन-तीन जण म्हणाले शरद पवार गटाचे तर बाकीचे काही जण म्हणाले अजित पवार गटातून आहोत. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहिजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिल”, असंही राज ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्राचे जुने दिवस आणायचे असतील तर जनतेनं याचं भान ठेवलं पाहिजे. केंद्रात पंतप्रधान मोदी यांना आणायचं, इथपर्यंत ठिक आहे. पण जमिनीवर जर अशाप्रकारचे राजकारण होत राहिले, तर ते राज्यासाठी फार पोषक आहे, असे म्हणता येणार नाही. भविष्यात जे तरूण-तरूणी राजकारणात येऊ इच्छितात, त्यांना हेच राजकारण आहे, असे वाटू शकेल. त्यामुळे राजकारण आणखी खराब होत राहील”, असेही मत राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तुतारी चिन्हावरून टोला लगावताना सुजय विखे पाटील यांनीही टीका केली होती, ते म्हणाले होते की, “मशाली घ्या तुतारी वाजवा. हवे तर त्यांना नव्या तुतारी घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल. चिन्ह देणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेले आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेले आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यंत बॅलेटवर चिन्ह येत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही”, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा : Mumbai Police : ‘आले रे आले मुंबई पोलीस’, हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल; गाणं पाहून तुम्हीही कराल सलाम!