28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय“तुतारी वाजेल की, हवा निघेल”, सुजय विखेंचा नव्या पक्ष चिन्हावरून शरद पवार...

“तुतारी वाजेल की, हवा निघेल”, सुजय विखेंचा नव्या पक्ष चिन्हावरून शरद पवार गटाला टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या गटाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह शरद पवार गटाला दिलेले आहे, त्यावरून राजकीय वर्तुळात समिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाजपचे नेते सुजय विखे-पाटील, चित्रा वाघ यांसारख्या विरोधकांनी शरद पवार गटाला मिळालेल्या नव्या चिन्हावरून तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे.

तुतारी हे नवं चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आले आहे की, “आता अवघा देश होणार दंग, खासदार शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकले जाणार विकासाचे रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे.” यावरूनच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी तुतारी चिन्हावरून टोला लगावला आहे.

तुतारी चिन्हावरून टोला लगावताना सुजय विखे पाटील म्हणाले की, “मशाली घ्या तुतारी वाजवा. हवे तर त्यांना नव्या तुतारी घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल. चिन्ह देणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेले आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेले आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यंत बॅलेटवर चिन्ह येत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही”, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही ‘तुतारी’ या चिन्हावरून शरद पवार गटावर टीका करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही टीका करत असताना त्यांना ट्विटरवरून थेट कविता लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की… “ओ मोठ्ठ्या ताई… तुतारीतुनी थकाल वाजवुनी, भाजपद्वेषाची जुनी पिपाण… करा कितीही खोटे पेरणी, परि जनतेच्या ना पडेल पचनी… उंटावरली उगा अनेक शहाणी, पोकळ बडविती नगारखानी… लवकरच तुम्हा पाजू पाणी, सज्ज आम्ही आहो युद्धरणीं…” अशी टीका चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ गटाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचं लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनीच स्वतः आमच्यातील मैत्रीचे दरवाजे बंद केले; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी