29 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या घोडेबाजाराला लावला चाप

मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या घोडेबाजाराला लावला चाप

टीम लय भारी

मुंबई : ‘विनंती बदल्या’ या गोजिरवाण्या नावाखाली मंत्रालयात सुरू झालेल्या घोडेबाजाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाप लावला आहे ( Uddhav Thackeray has stopped the transfer of officers ).

‘बदल्यांची कुठलीही प्रकरणे माझ्याकडे आणू नका’, अशी सरळ तंबी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिली आहे. त्यामुळे मलईदार पदांसाठी टपून बसलेल्या अधिकाऱ्यांचा मोठाच हिरमोड झाला आहे. नवीन ठिकाणी बदली करून घेण्यासाठी या अधिकाऱ्यांना आता एप्रिल – मे पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला बदल्यांना ब्रेक लागल्याने मंत्री व त्यांच्या कार्यालयातील अनेकांचा अर्थप्राप्तीचा खोळंबा झाला आहे. बदली हवी असलेले व बदली करून देणारे अशा दोन्ही गटांतील मंडळींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे वचक बसली आहे.

गेल्या तीन – चार महिन्यांत सर्वच खात्यांमध्ये बदल्यांचा सपाटा सुरू होता. 3 वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या मोठ्या संख्येने झाल्याच. पण ‘विनंती’च्या नावाखाली सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात स्थानिक भाजपच्या आमदार व खासदारांना सोयीस्कर ठरतील असे अधिकारी तालुका, जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात नेमले होते. विनंती बदल्यांच्या नावाखाली अशा अधिकाऱ्यांच्या ठाकरे सरकारने उचलबांगड्या केल्या.

गृह, महसूल, कृषी, सहकार, पीडब्ल्यूडी अशा अनेक खात्यांत बदल्या मोठ्या प्रमाणात झाल्या. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना फायद्याच्या ठरू शकतील अशा पद्धतीने अधिकारी ठिकठिकाणी नेमण्यात आले.

परंतु काही मंत्र्यांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी ‘विनंती बदल्यां’चा गैरफायदा घेत मलई ओरपण्याचाही प्रकार केला. बदल्यांच्या अर्थपूर्ण प्रकारांची प्रसारमाध्यमांमधून जोरदार चर्चा झाली. भाजपच्या नेत्यांनीही टीकेची झोड उठविली. परिणामी ठाकरे सरकारची बदनामी झाली.

‘बदल्यां’च्या कारणांवरून जनमाणसांत सरकारविरोधी संदेश गेला. त्यामुळे बदल्यांची नवी सर्व प्रकरणे थांबविण्यात आली आहेत. बदल्यांची कोणतीही फाईल माझ्याकडे आणू नका अशी ताकीद मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे.

तीन वर्षे पूर्ण व्हायच्या आतच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी बदली विरोधात ‘मॅट’मध्ये धाव घेतली. मॅटने बदल्यांचे अनेक निर्णय रद्दबातल केले आहेत. त्यामुळेही ठाकरे यांनी नव्याने बदल्या न करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी