30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeटॉप न्यूजमुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी; राज्यात दोन नव्या वंदे भारत...

मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी; राज्यात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस

सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर प्रवासाला किती वेळ लागेल ते जाणून घ्या ... ** खंडाळा व कासारा घाटातून आजवर फक्त पुश-पुल तंत्रज्ञान वापरले जाते. पार्किंग ब्रेक चाचणी यशस्वी झाल्यास भविष्यात मुंबईहून नाशिक व पुण्यासाठी थेट लोकलसेवा सुरू करणेही शक्य होऊ शकेल.

साईभक्तांसाठी चांगली बातमी आहे – मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी ! शुक्रवार, 10 फेब्रुवारीपासून शिर्डीसह सोलापूरसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. राज्यात सध्या दोन  ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू असून त्यात आता या दोन नव्या मार्गांची भर पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. यापैकी एक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे दाखल झाली आहे, तर दुसरी सोमवारी, 6 फेब्रुवारी रोजी पोहोचणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत राज्यातील दोन नव्या वंदे भारत ट्रेनची माहिती दिली. भारतात लवकरच एकूण 400 वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. यातील 8 गाड्या राज्यात धावतील. सध्या राज्यात फक्त दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मुंबई-गांधीनगर आणि नागपूर-विलासपूर या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राज्यात सध्या सुरू आहेत. 10 फेब्रुवारीला आणखी दोन नव्या एक्सप्रेस सुरू होणार असल्याने राज्यातील वंदे भारत गाड्यांची संख्या आता 4 वर पोहोचणार आहे. नव्या वंदे भारत ट्रेन मुंबईहून शिर्डी आणि सोलापूर या शहरांमधील प्रवास सुखकर आणि जलद करणार आहेत.


मुंबई-शिर्डी सेमी हाय स्पीड वंदे भारत ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. 

मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन्ही मार्गावर देशातील सर्वात कठीण रेल्वे घाट विभाग आहेत. या विभागात गाड्या उंचावरून मागे येऊ नयेत (रिव्हर्स) म्हणून त्यांना मागून पुश करण्यासाठी एक अतिरिक्त लोकोमोटिव्ह इंजिन वापरले जाते. पुढले इंजिन डबे ओढून नेते (पुल) तर मागचे इंजिन मागून जोर लावून (पुश) ताकद देते. या पुल-पुश तंत्राशिवाय घाट पार करणे अवघड असते. मात्र, या दोन्ही मार्गावर घाटातून धावणार असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनना मागच्या बाजूने ढकलण्यासाठी अतिरिक्त लोकोमोटिव्ह इंजिन वापरले जाणार नाही, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली आहे. त्याऐवजी, या सेमी हाय स्पीड गाड्यांमध्ये पार्किंग ब्रेक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

पुढील सोमवारी पहिल्या प्रवासाआधी दोन्ही घाट मार्गांवर पार्किंग ब्रेकची चाचणी घेतली जाणार आहे. नव्या मार्गांवर मुंबईबाहेर, कल्याणच्या पुढे कर्जत आणि कासारा मार्गांवर असलेल्या घाट विभागात वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या दोन्ही घाटातून आजवर फक्त पुश-पुल तंत्रज्ञान वापरले जाते. पार्किंग ब्रेक चाचणी यशस्वी झाल्यास भविष्यात मुंबईहून नाशिक व पुण्यासाठी थेट लोकलसेवा सुरू करणेही शक्य होऊ शकेल, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने ‘लय भारी’ला सांगितले. भोर आणि थळ घाटांचा ग्रेडियंट (चढाव) 1:37 आहे. म्हणजे या घाटात दर 37 मीटरमध्ये जमिनीची समुद्रपातळीपासूनची ऊंची सुमारे 1 मीटरने वाढते.

 Vande Bharat Express वंदे भारत एक्सप्रेस केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे
वंदे भारत एक्सप्रेस

कसारा व कर्जत या घाटमार्गांवर गाड्यांना धक्का देणार्‍या अतिरिक्त लोकोमोटिव्ह इंजिनला ‘बँकर्स’ पुश म्हणतात. ते घाटाच्या चढावावर गाड्यांना मागे (रिव्हर्स) जाण्यापासून रोखतात. तथापि, या तांत्रिक थांब्यांमुळे प्रवासाच्या वेळेत विलंब होतो. कर्जत, खंडाळा, लोणावळा व कल्याण, कसारा, इगतपुरी येथे बँकर्स काढले जातात. नव्या तंत्रामुळे वंदे भारत गाड्यांना हे थांबे तांत्रिक टळतील, कारण ही ट्रेन बँकर इंजिन जोडल्याशिवाय धावणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल.

हे सुद्धा वाचा : 

पुढील तीन वर्षांत भारतात “400 वंदे भारत ट्रेन” येणार

मोदींनी उद्घाटन केलेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे प्रवासी भाडे किती ?, जाणून घ्या सर्व माहिती

खुशखबर! आता मुंबईकरांना शिर्डीला फक्त तासाभरात पोहोचता येणार

मुंबई-शिर्डी या 340 किमी मार्गावर वंदे भारत ट्रेन ही नाशिककडे जाताना कसारा भागातील थळ घाटमार्गे धावेल. वंदे भारत ट्रेनने मुंबई-शिर्डी प्रवासाला फक्त 5 तास 25 मिनिटे वेळ लागेल. मुंबई-सोलापूर या 455 किमी मार्गावर वंदे भारत ट्रेन ही पुण्याकडे जाताना कर्जत आणि खंडाळा दरम्यान असलेल्या भोर घाटातून जाईल. वंदे भारत ट्रेनने मुंबई-सोलापूर प्रवासाला फक्त 6 तास 35 मिनिटे वेळ लागेल. वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई-पुणे अंतर फक्त  एक तास 50 मिनिटात कापले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही ट्रेन धावणार नाही. मुंबई ते सोलापूर प्रवासात या ट्रेनला एकूण दहा प्रवासी थांबे असतील, असे सांगितले जात आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार , वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून सायंकाळी 4:10 वाजता निघून रात्री 10:45 ला सोलापूरमध्ये पोहोचेल. 
मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, राज्यात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस, रावसाहेब दानवे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी