31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजसंजय निरूपमांचा काँग्रेसवर बॉम्बगोळा, सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांवरच डागली तोफ

संजय निरूपमांचा काँग्रेसवर बॉम्बगोळा, सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांवरच डागली तोफ

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सोनिया गांधी यांच्या अवतीभवतीच्या लोकांकडे ज्ञान नाही. ते बायस्ड आहेत. एकेकाला कसे संपवायचे याचाच ते विचार करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष संपून जाईल. त्याला कोणीही वाचवू शकणार नाही, असा तोफगोळा काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी डागला. तिकिट वाटपामध्ये मी सुचविलेल्या एकाही उमेदवाराला संधी दिली नसल्याचे सांगत निरूपम यांनी थेट दिल्लीतील ‘अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी’चे नाव घेत सोनिया गांधी यांच्यावरच अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. राहूल गांधी यांच्या जवळच्या लोकांना संपविण्याचे षडयंत्र कमिटीमधील लोक करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

राहूल गांधी अध्यक्ष असताना कमिटीचे लोक त्यांच्या विरोधात कारस्थाने करीत होते. हेच कारस्थानी लोक आता सोनिया गांधींना मार्गदर्शन करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. मी पक्षविरोधी बोललो म्हणून मला पक्षातून काढून टाकले तरी चालेल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याची घोषणाही निरूपम यांनी यावेळी केली. हरियाणाचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. तिकिट वाटपामध्ये पैसे घेतले जात असल्याचा आरोप तंवर यांनी केला होता. त्याचाही दाखला निरूपम यांनी दिला. जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन निरूपम यांनी दिल्लीतील नेतृत्वावरच हल्लाबोल केला असल्याने खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचा महासचिव जे सांगेल तोच निर्णय अध्यक्षांमार्फत अंतिम केला जातो. महासचिव सुद्धा माणूस असतो. त्याच्यामध्येही स्वार्थ, लोभ, अहंकार, बदला घेण्याची भावना असू शकते असे सांगत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनाच निरूपम यांनी आरोपीच्या पिंचऱ्यात उभे केले. पूर्वी नुसत्या महासचिवांच्या शब्दांवरच निर्णय घेतले जात नव्हते. दुसरी समांतर व्यवस्था होती. तळागाळातील परिस्थितीची माहिती घेऊन निर्णय घेतले जायचे. पण आज ही परिस्थिती राहिलेली नाही. महासचिव सगळे निर्णय घेतात. काँग्रेसमधील ही पद्धत दोषपूर्ण आहे. त्यात पक्षाने बदल केले नाही तर पक्षाचे भयंकर नुकसान होईल. पक्षाची वाट लागेल, तो बरबाद होईल, असाही घणाघात त्यांनी केला.

मुंबईतील प्रत्येक जिल्ह्यातील किमान एका मुसलमान उमेदवाराला तिकिट द्यायला हवे. कारण त्यांची मोठी व्होटबँक आहे. पण दिल्लीतील लोकांना हे कळतच नाही. 77 वर्षाच्या व्यक्तीला तिकिट दिले गेले आहे. या व्यक्तीने स्वतःसाठी तिकिट मागितले नव्हते. मुलासाठी मागितले होते. मुंबईतील 3 – 4 जागा सोडल्या तर आमच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, अशी कटू भविष्यवाणी देखील निरूपम यांनी केली.

कोणताही सर्व्हे नाही, जमिनीवरची वस्तुस्थिती लक्षात घेतलेली नाही. आपल्या आवडीच्या व नाआवडीच्या निकषावर ही नावे अंतिम केली आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर मुंबईत काँग्रेसविरोधी प्रकार वाढले आहेत. ते आल्यानंतर त्यांनी माझ्याविरोधात सतत बंड चालू असले पाहीजे याची काळजी घेतली. ऐन लोकसभा निवडणुकीत मला अध्यक्षपदावरून हटवले. त्याचा काहीसा लोकसभा निवडणुकीवर परिणाम झाला. काँग्रेसमध्ये माझ्यासारख्या संघर्ष करणाऱ्या लोकांची गरज नाही, असे वाटू लागले आहे.

मी सध्या तरी काँग्रेस सोडणार नाही. पण हे असेच चालू राहिले तर विचार करावा लागेल. काँग्रेस पुनर्रज्जिवीत व्हावी. देशात मजबूत व्हावी अशी माझी इच्छा आहे. पक्ष नेतृत्वाने बदलत्या परिस्थितीचे आकलन करावे. बदलत्या परिस्थितीनुसार अंदाज घ्यावा. जे चापलुसी करीत नाहीत. बंद दरवाजात राजकारण करीत नाहीत, त्यांना महत्व द्यायला हवे. अन्यथा कॉंग्रेसची स्थिती आणखी वाईट होईल. काँग्रेसवर वाईट दिवस येतील, अशी मला शंका आहे.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतूनही तक्रारी आल्या आहेत. अनेक चांगल्या उमेदवारांना तिकिटे दिली नाहीत. अशोक चव्हाणही नाराज आहेत. निवडणूक लढण्याची कसलीही तयारी काँग्रेसने केलेली नाही. अशोक चव्हाण व मलाही निवडणूक काळातच काढून टाकल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी