27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयशिवसेना कुणाची : सुनावणी काही मिनिटेच चालली...

शिवसेना कुणाची : सुनावणी काही मिनिटेच चालली…

शिवसेना कुणाची व धनुष्यबाण कुणाचा यासह विविध मुद्द्यांवर नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेली सुनावणी सोमवारी केवळ काही मिनिटेच चालली. या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी थेट जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता पुढील वर्षी होईल. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व बाळासाहेबांची शिवसेना यामध्ये शिवसेना व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. आज याबाबत सुनावणी होती.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार, खासदारांसहित उध्दव ठाकरे यांची साथ सोडली मात्र शिवसेनेवर व धनुष्यबाणावर आपला दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे व त्यांच्या समर्थकांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा वाद आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगात गेला आहे. या वादावर निर्णय घेण्यासाठी दोन्ही बाजूंना आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी कागदपत्रे जमा केल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख देण्यात आली होती. मात्र आज सुनावणी अवघी काही मिनिटांत आटोपली व आयोगाने याप्रकरणी पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आता याबाबत धनुष्यबाण चिन्ह व इतर मुद्द्यांवर सुनावणी होईल. या बाबत आज काहीही युक्तीवाद झाला नाही. केवळ काही मिनिटेच कामकाज झाल्याने या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकलेली नाही. अनिल देसाई म्हणाले, आम्ही दिलेल्या दस्ताऐवजाची छाननी होईल, असे आम्हाला वाटले होते मात्र ही प्रक्रिया आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. आम्ही आमच्या बाजूने पूर्ण तयार असल्याचा दावा देसाई यांनी केला. ३ लाख प्रतिज्ञापत्रे दिल्याची माहिती त्यांनी दिली.
हे सुद्धा वाचा
कोचिंग क्लासच्या तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोट न सापडल्याने गुढ वाढले

सर्वसामान्यांना दिलासा; महागाईचा आलेख खालावला

अरे, हे काय? सुशांत सिंग राजपूतला विसरली रिया चक्रवर्ती, सलमानशी खास नाते असलेल्या, सोनाक्षी-सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंडशी करतेय डेट!

केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीसाठी दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढा देण्यासाठी मोठी वकिलांची फौज उतरवली आहे. आजच्या सुनावणीसाठी शिंदे गटाकडून केवळ वकील उपस्थित होते. शिंदे गटाकडून कोणीही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांसहित बंड केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागल्याने राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे यांना शिवसेनेच्या खासदारांनी देखील साथ दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा केला. दरम्यान मुंबईत विधानसभेची पोटनिवडणूक लागल्याने निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे पक्षचिन्ह व शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी