29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown : तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन

Lockdown : तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सध्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत ब-याच गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी लॉकडाऊन (Lockdown) पूर्णपणे शिथिल करण्यात आला नाही. अशातच सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची मुदत ३० जून रोजी पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर ३० जूननंतर लॉक डाऊन पूर्णपणे उठवला जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, राज्यातील जनतेच्या मनामध्ये घोंघावत असलेल्या या प्रश्नाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून त्यांनी, जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असे वाटले तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लागू करावा लागेल, असा इशारा दिला आहे. निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

“आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावे लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावले टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेले नाही. अजूनही लढा संपलेला नाही. कोरोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

“कोरोनासोबत जगायला शिका असे जगभरात सांगितले जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवले पाहिजे,” असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असे लक्षात आले तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे. जनता सरकारचे ऐकत आहे. म्हणून मी जनतेचे आभार मानतो. गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थिती ती होता कामा नये,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकलेच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचे पालन करावेच लागणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी येत्या २२ तारखेपासून आपल्या विधिमंडळाचे जे अधिवेशन घेण्याचं योजलं होतं, त्या अधिवेशनाबद्दल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. एकूणच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला हे अधिवेशन घेता येणे कठीण आहे. २२ जूनला सुरु होणारे अधिवेशन हे ३ ऑगस्टला घेण्याचे ठरलेले आहे, असे सांगितले.

चक्रीवादळाबद्दल, साधारणत: आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो आहोत. नुकसान खूप झालेले आहे. आम्ही आढावा घेतला, पंचनामे तर सुरू आहेत. पंचनामे झाल्यानंतर अधिक माहिती घेऊन त्याची भरपाई होईलच.

ज्यावेळी मी गेलो तेव्हा रायगड जिल्ह्यासाठी तत्काळ १०० कोटी त्यानंतर रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदुर्गला २५ कोटींची मदत करण्यात आली. जे जे करणे शक्य आहे, ते करण्यात येईल. कोणालाही आम्ही उघडे पडू देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना महाविकास आघाडीचे सरकार खंबीरपणे साथ देईल, असे ते म्हणाले.

तसेच जे सरकारने सांगितले की सकाळी ५ पासून संध्याकाळी ७ पर्यंत तुम्ही मैदाने किंवा इतर ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता, व्यायामाला जाऊ शकता. पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ती झुंबड बघितल्यानंतर थोडी घाबरुक वाटली. व्यायाम करायला आरोग्यासाठी सांगितले आहे, आरोग्य खराब करायला नाही. सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे. जर वाटल की ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे, जनता सरकारचे ऐकत आहे. कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे, ते आपल्या हिताचे आहे. मी जनतेला सांगतो की गर्दी टाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा पहिल्यापासून सज्ज होती. एक गोष्ट नक्की की जे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत ते खांब उभारता येऊ शकतात, ते खांब उभारण्याचे काम सुरू आहे. पण वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी जी तांत्रिक टीम लागते, त्या टीम आम्ही इतर जिल्ह्यातून बोलावलेल्या आहेत आणि ते काम सुरू झालेले आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी