29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeव्यापार-पैसाकांदा, भुसार मालाचे लिलाव ठप्पच!

कांदा, भुसार मालाचे लिलाव ठप्पच!

शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली, तोलाई कपातीवरून कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे लिलाव बंद ( Onion Auction closed ) होऊन बाजार समित्यांमध्ये कामकाज ठप्प ( Onion auction stalled ) झाले आहे. यातून मार्ग केव्हा निघतो, याकडे शेतकऱ्यांचे विशेषत: कांदा ( Onion ) उत्पादकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱ्या माथाडी, मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, वाराईची मजुरी शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून कपात करून देण्यास व्यापारी व आडत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारातील व्यवहार ठप्प झाले आहेत. पूर्वप्रचलित पद्धतीनेच हमाली व तोलाईची रक्कम कपात करावी, अशी मागणी माथाडी व मापारी कामगारांनी केली आहे.( Onion, straw auction stalled!)

कांदा व भुसार मालावर दोन टक्के हमाली, तोलाई कापली जाणार नसल्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतल्यानंतर हा वाद विकोपाला गेला आहे. आम्ही शेतमाल घेण्यास तयार आहोत; परंतु शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात करणार नाही, अशी व्यापाऱ्यांची भूमिका कायम आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि. ४) उप कामगार आयुक्तांसमोर झालेल्या बैठकीत माथाडी व मापारी कामगारांनी हा प्रश्न सोडविण्याची मानसिकता युनियनचे सचिव सुनील यादव यांनी दर्शविली. सहकार उपायुक्त विकास माळी व सहकार निबंधक फय्याज मुलानी यांनी देखील सध्या प्रचलित म्हणजे जुन्या पद्धतीनुसारच कपात करून बाजार समित्या सुरू ठेवाव्यात, असे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. मात्र, आडते व व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठ्या धोरणामुळे माथाडी, मापारी व शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे युनियनने म्हटले आहे. मार्च अखेरमुळे तीन दिवस व्यवहार बंद होते. आता पुन्हा लिलाव बंद राहणार असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याची झळ बसणार आहे . लिलाव सुरू झाल्यानंतर आवक वाढून भाव कोसळण्याची भीती देखील उत्पादकांनी व्यक्त केली.

सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगार दैनंदिन वजनमापाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत, असे कामगारांनी पत्रान्वये बाजार समित्यांना कळविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ४ एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत लिलाव बंद राहतील, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
सरकार असू द्या, बाजार समित्या असू द्या किंवा इतर सर्व घटक शेतकऱ्याला वेगवेगळ्या मार्गांनी लुटतात. बाजार समित्या कधीही बंद नकोत, अशी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची कायमच भूमिका राहिलेली आहे. आता काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतात कांदा भिजला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ज्या शेतकऱ्यांना कांदा विक्रीची गरज आहे. त्यांना बाजार समित्या बंदमुळे नाहक त्रास होत आहे

– भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी