32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
HomeसंपादकीयIAS अधिकाऱ्याचा एक एसएमएस, आणि देवेंद्र फडणविसांकडून शिवरायांच्या प्रकल्पासाठी ६०० कोटीचा निधी...

IAS अधिकाऱ्याचा एक एसएमएस, आणि देवेंद्र फडणविसांकडून शिवरायांच्या प्रकल्पासाठी ६०० कोटीचा निधी मंजूर, थर्टी फर्स्टची अनोखी कहाणी

(तुषार खरात) मी ‘सकाळ’मध्ये (सकाळ इन्हेस्टीगेशन टीमचा – एसआयटीचा प्रमुख म्हणून) नोकरीत असताना एके दिवशी, ३१ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जलसंधारण खात्याचे तत्कालिन सचिव प्रभाकर देशमुख यांचा फोन आला. ‘तुषार, तुम्ही कुठे आहात’ असे त्यांनी विचारले. त्यावेळी मी विक्रोळी स्थानकावर होतो. कार्यालयात लवकर जायला निघालो होतो. काही महिन्यांअगोदर मी छगन भुजबळ यांच्या पीडब्ल्यूडीमधील भ्रष्टाचाराची आठ पोती कागदपत्रे बाहेर काढली होती. त्यामुळे १३ अधिकारी निलंबित झाले होते. या कागदपत्रांचा अभ्यास / रिसर्च करण्यासाठी मी त्यावेळी कार्यालयात बराच वेळ खर्ची घालत होतो. माझ्या कार्यालयातील हे गोपनीय काम असल्याने मी देशमुख साहेबांना या विषयी काही बोललो नाही. त्यांनाही अशा शोधक पत्रकारितेत फार स्वारस्य नव्हते. (छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराची कहाणी नंतर कधीतरी सांगेन). आता मुळ मुद्याकडे येतो.

देशमुख साहेब म्हणाले, तुम्ही घरी परत जा, आणि बॅगेत कपडे भरून या. आपल्याला ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करायला दोन दिवस बाहेर जायचे आहे. तुम्ही आल्यानंतर मी सविस्तर सांगतो. देशमुख साहेब माझ्या गावाकडचेच (ता. माण, जि. सातारा) असल्यामुळे आमच्यामध्ये जिव्हाळा होता. गावाकडून आलेला पोरगा मुंबईत पत्रकारिता करतो याचे त्यांना मोठे कौतुक होते. त्यापेक्षाही त्यांना जास्त कौतुक होते ते दुसऱ्याच गोष्टीचे. मी पुढाकार घेवून गावी ‘चार गाव जलयुक्त शिवार अभियान’ प्रभावीपणे राबविल्याचे होते. हे काम पाहण्यासाठी आमिर खाने याने आमच्या गावात सत्यजित भटकळ यांच्या नेतृत्वाखाली एक टीम पाठविली होती. त्या टीमने दोन टप्प्यात चार दिवस आमच्या कामांची सखोल पाहणी केली होती. ‘वॉटर कप’ जन्माला घालण्याअगोरच अमिर खान यांच्या जलसंधारणाची कामे अचूक, शास्त्रशुद्ध व प्रभावीपणे कशी करावीत, आमच्या गावाचा आदर्श घेतला होता. आणि आधारेच वॉटर कपच्या जलसंधारणाचे मॉडेल ठरविले होते. आमिर खानच्या टीमने त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर माझे चार व्हिडीओ सुद्धा त्यावेळी प्रसिद्ध केले होते.
दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत लाडकी योजना जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रात सुरू होती. या योजनेचे जनक जनक प्रभाकर देशमुख हे होते. माझ्या आठवणीनुसार पहिल्या वर्षी ५ हजार गावांची या योजनेसाठी निवड झाली होती. त्यात आमचे गाव नव्हते. तरीही आम्ही चार गावे एकत्र येवून ‘चार गाव जलयुक्त शिवार अभियान’ राबविले होते. सरकारचा सपोर्ट नसतानाही आम्ही प्रभावी काम करून दाखविले होते. त्यामुळे देशमुख साहेबांना माझ्याबद्दल कौतुक होते. आम्ही या अभियानात नसतानाही नंतर त्यांनी विशेष बाब म्हणून आमच्या चार गावांसाठी ६ कोटी रुपयांची जलसंधारणची कामे दिली होती.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख साहेबांची जलयुक्त शिवार योजना अक्षरशः डोक्यावर घेवून भाजप सरकारचा फ्लॅगशिप कार्यक्रम बनविला होता. प्रभाकर देशमुखांवर त्यावेळी देवेंद्र फडणवीस बेहद्द खूष होते.
प्रभाकर देशमुख यांनी सांगितल्यानुसार मी बॅग भरून मंत्रालयाजवळ पोचलो. पण निघता निघता दुपार होवून गेली. दुपारनंतर फोर व्हिलरने आम्ही चालते झालो. आपण कुठे जाणार आहोत याची माहिती प्रवासात देशमुख साहेबांनी दिली. एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील थर्टी फर्स्टच्या पार्टीचे त्यांच्या कुटुंबासाठी पासेस आले होते. पण असल्या पार्ट्या करण्यात देशमुख साहेब व त्यांच्या संस्कारी कुटुंबाला काहीही स्वारस्य नव्हते. त्यांना ‘थर्टी फर्स्ट’ वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा होता. त्यासाठी त्यांनी ठिकाण निवडले होते, रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी !
आम्ही पाचाडमध्ये पोचलो तेव्हा रात्र झाली होती. त्यावेळी कोकणचे विभागीय आयुक्त श्री. तानाजी सत्रे होते. सत्रे साहेब तर माझ्या बाजूच्याच गावचे. जिल्हाधिकारी शितल उगले होत्या. जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप पांढरपट्टे होते. देशमुख साहेब व सत्रे साहेब यांच्यात अतुट मैत्री आहे. एकमेकांविषयी जिव्हाळा व आपुलकी सुद्धा आहे. त्यामुळे देशमुख साहेबांच्या जे काही डोक्यात होते, त्याला सत्रे साहेबांनी डोळे झाकून पाठींबा दिला होता (ती कहाणी पुढे येईलच). हे सगळे अधिकारी त्यावेळी ‘प्रोटोकॉल’मुळे तिथे उपस्थित राहिलेले होते.
आम्ही पाचाडमध्ये पोचलो तेव्हा गावकरी देशमुख साहेबांची वाट पाहात बसले होते. गावकऱ्यांसोबत संवादाचा कार्यक्रम झाला. गावातील, रायगडावरील, पायथ्याशी असलेल्या मॉ जिजाऊंशी संबंधित सगळ्या समस्या सांगा, असे देशमुख साहेबांनी आवाहन केले. गावकऱ्यांनी सांगितलेली प्रत्येक समस्या देशमुख साहेबांनी टिपून घेतली. रायगड किल्ल्याची फारच दुरावस्था झालेली आहे. तटबंदी, बुरूजांचे एकेक दगड निसटून जात आहे. पडझड सुरू आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या व्यवस्थित नाहीत. समाधीही जीर्ण झालेली आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या शिवप्रेमींचे पाय घसरून गंभीर अपघात झालेले आहेत. काही शिवप्रेमी दगावल्याचीही हृदयद्रावक घटना लोकांनी सांगितली. शेकडो समस्या लोकांनी सांगितल्या. त्या प्रत्येक समस्या देशमुख साहेबांनी कागदावर टिपून घेतल्या. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडमध्ये मॉं. जिजाऊंची समाधी आहे. मॉ. जिजाऊंचे वय जास्त झाले तेव्हा त्यांना रायगडावरील थंड वारा सहन होत नव्हता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जिजाऊंसाठी स्वतंत्र वाडा पायथ्याला, म्हणजेच पाचाड गावात बांधला होता. जिजाऊंच्या सेवेसाठी शिवरायांनी आपल्या एका राणीचाही महाल खाली बांधला होता. या वाड्याची सुद्धा पडझड झालेली होती. शिवरायांवर मराठी माणसांची मोठी श्रद्धा आहे. शिवजयंतीला लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी किल्ल्यावर येतात. पण त्यांना पिण्याचे पाणी देता येत नाही. कारण पावसाळ्यानंतर किल्ल्याच्या परिसरात पाणी उपलब्ध नसते. महाराष्ट्रात सत्तेवर कोणत्याही पक्षाचे सरकार येवो, सत्तेत येण्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यावेच लागते. पण शिवरायांच्या राजधानीची पडझड झाली आहे. त्यासाठी कुठलेच सरकार काहीच करीत नाही, अशी नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली. अशीच परिस्थिती राहिली तर करोडो शिवप्रेमींचे हे प्रेरणास्थान नामशेष होईल, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. तीन चार वर्षांच्या अगोदर नरेंद्र मोदी या किल्ल्यावर येवून गेले होते. त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते. मोदी शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले होते. डोळे मिटून समाधीसमोर बसून ते ध्यानस्त झाले होते (माझ्या आठवणीनुसार अर्धा – पाऊण तास वगैरे). मोदी यांची शिवाजी महाराजांवर अपार श्रद्धा आहे.
गावकऱ्यांसोबतचा हा संवाद किमान तीन – चार तास चालला असेल. त्यावेळी देशमुख साहेबांनी त्यांच्या पत्नी सौ. अनुराधाकाकी यांनाही पुण्यावरून बोलावून घेतले होते. पुण्यावरून येताना त्यांनी फुले व सजावटीचे सामान आणले होते.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्री. देशमुख साहेब व सौ. देशमुख काकी यांनी हातात झाडू घेतला आणि मॉ. जिजाऊंच्या समाधीचा परिसर झाडायला सुरूवात केली. या स्वच्छता मोहिमेत अख्खं गाव सामील झाले. प्रोटोकॉलमुळे तिथे आलेले अन्य अधिकारी, अगदी प्रांताधिकारी, तहलिसदार, कृषी सहायक, ग्रामसेवक ही मंडळी सुद्धा प्रोत्साहित होवून झाडलोट करू लागली. दोन तास स्वच्छता मोहीम केली. मॉ जिजाऊंच्या समाधीची फुलांनी सजावट केली. भरपूर पणत्या लावल्या. ३१ डिसेंबरच्या रात्री बारा वाजता फुलांनी सजविलेली मॉ. जिजाऊंची समाधी पणत्यांच्या लखलखाटात उजळून निघाली. अशा पद्धतीने देशमुख साहेब व त्यांच्या सौभाग्यवतींनी अनोख्या पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा केला. मलाही मॉं. जिजाऊंचा परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले.
दुसऱ्या दिवशी, १ जानेवारीचा दिवस उजाडला. नव्या वर्षाची सुरूवात झाली. सकाळी लवकर उठून देशमुख दांपत्य व आम्ही सगळेजण ‘रोप वे’ने रायगडावर पोचलो. किल्ल्यांचे अभ्यासक असलेल्या समेळ नावाच्या एका गृहस्थांनाही देशमुख साहेबांनी त्यावेळी बोलाविले होते. आम्ही सगळ्यांनी किल्ल्याचा पूर्ण परिसर पिंजून काढला. किल्ल्यावरील प्रत्येक समस्या देशमुख साहेबांनी पाहिली. अर्धा दिवस किल्ल्यावर घालवला. शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होवून देशमुख साहेबांनी (व त्यांच्यामुळे आम्हीही) नव्या वर्षाची सुरूवात केली.
परत आम्ही मुंबईकडे परतलो. प्रवासात असतानाच देशमुख साहेबांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक एसएमस केला. रायगड किल्ल्याची फारच मोठी दुरावस्था झाली असल्याचे त्यांनी एसएमएसद्वारे फडणवीस यांना कळविले.
हे सगळं घडत असताना देशमुख साहेब व तानाजी सत्रे साहेब यांच्यात सतत चर्चा सुरू होती. देशमुख साहेबांनी पुण्याचे जिल्हाधिकारी असताना शिवनेरी किल्ल्याचा विकास केला होता. त्या धर्तीवर रायगड किल्ल्याचाही विकास करता येईल, अशी चर्चा देशमुख साहेब व तानाजी सत्रे साहेब यांच्यात झाली. त्या चर्चेनंतर तानाजी सत्रे साहेबांनी रायगड विकासासाठीचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी सत्रे साहेबांनी बरीच मेहनत घेतली. तज्ज्ञ मंडळींना रायगड किल्ल्यावर नेले. शिवनेरी किल्ल्याचीही पाहणी केली. सत्रे साहेबांनी पुढील तीन – चार महिने अपार मेहनत घेतली. अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. नितीन देसाईसारख्यांचाही सल्ला घेतला. शिवसृष्टी उभारण्याचाही विचार पुढे आला. त्यानंतर ५०० कोटी रुपयांचा रायगड किल्ला परिसराच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार झाला.
फडणवीस यांनी त्या प्रस्तावावर लगोलग पावले उचलली. नितीन गडकरी यांच्याकडून निधी प्राप्त करून घेतला. नंतर तो प्रस्ताव ५०० कोटींवरून ६०० कोटी रूपयांवर गेला. फडणवीस यांनी रायगडच्या विकासासाठी एक प्राधिकरण स्थापन केले. त्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले. संभाजीराजे आणि मी काही वर्षांअगोदर शांघाय दौऱ्यामध्ये एकत्र होतो (नंतर आमचा एवढा रॅपो राहिला नाही.). शिवरायांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे हे मानाचे पद गेले याचा मलाही त्यावेळी आनंद झाला.
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाकर देशमुख यांना प्रमोशन देत ग्रामविकास खात्याच्या सचिवपदावर बदली केली. देशमुख साहेब फडणवीस यांना भेटले व नम्रपणे त्यांनी हे पद नको म्हणून सांगितले. मला निवृत्त व्हायला सहा – सात महिनेच उरले आहेत. त्यामुळे कोकणचे विभागीय आयुक्तपद द्या. निवृत्त होण्याअगोदर रायगड किल्ल्याच्या विकासामध्ये मला योगदान देता येईल, अशी विनंती देशमुख यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनीही ती मोठ्या मनाने मान्य केली. त्यावेळचे विभागीय आयुक्त तानाजी सत्रे नुकतेच निवृत्त झाले होते. सत्रे साहेबांकडून सूत्रे हाती घेताना देशमुख साहेबांनी मला बोलावून घेतले होते. सूत्रे हाती घेण्याचे सोपस्कार पार पाडून आम्ही स्पीड बोटने अलिबागपर्यंत व नंतर रायगड किल्ल्यावर गेलो. शिवाजी महाराजांचे आशिर्वाद घेवून प्रभाकर देशमुख यांनी कोकण विभागीय आयुक्तपदाच्या कामाला सुरूवात केली.
रायगडच्या विकासाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व खात्यामार्फत पार पाडली जात आहे. शिवरायांप्रती भावनिक होवून आपण हा प्रकल्प सुरू केला. पण पुरातत्व खात्याकडून त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याची खंत प्रभाकर देशमुख यांनी नंतर खासगीमध्ये माझ्याजवळ व्यक्त केली होती.
हे ही वाचा
प्रभाकर देशमुख नंतर निवृत्त झाले, आणि राजकारणात आले. राजकारणात येताना त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्विकारले (शरद पवार मुख्यमंत्री असताना प्रभाकर देशमुख त्यांचे सचिव होते). देशमुख साहेबांनी जर त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. फडणवीस – देशमुख यांच्यातील नाते मी जवळून बघितले आहे. ‘सकाळ’मध्ये असताना आमचे मालक अभिजीत पवार यांच्याबरोबर मी देवेंद्र फडविसांबरोबरच्या किमान १५ – २० बैठकांमध्ये तरी सहभागी झालो असेल. AP सरांसाठी मी आणि माझी टीम फडणवीस व अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या अपॉईन्मेट घ्यायचो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण पददेशी यांच्या माध्यमातून अभिजीत पवारांची प्रभाकर देशमुखांसोबत ओळख करून दिली होती. ‘डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशन’ या मोहिमेअंतर्गत जलसंधारण चळवळीचा एक वेगळा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतला होता. ‘सकाळ’सोबत जलसंधारण उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने फडणवीस यांनी देशमुखांना काही सुचना केल्या होत्या. वॉटर कपसाठी आमिर खान फडणवीस यांना भेटला होता. त्यावेळी सुद्धा फडणवीस यांनी आमिर खानची देशमुखांसोबत गाठ घालून दिली होती. फडणवीस व देशमुख यांच्यातील हे नाते लक्षात घेता देशमुख भाजपमध्ये गेले असते तर फडणवीसांनी त्यांना खूप मोठे केले असते. पण देशमुखांनी पवारांसोबत राजकीय प्रवास सुरू केला. अजित पवारांच्या बंडानंतरही देशमुख साहेबांनी शरद पवारांसोबतच आपली बांधिलकी जपली आहे.
प्रभाकर देशमुख हे प्रचंड हुशार, सामान्य लोकांना मदत करणारे, चांगल्या योजना राबविणारे, मनमिळावू, बोलायला अत्यंत मृदू अशा स्वभावाचे अधिकारी आहेत. ते ज्या माण – खटाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढले तिथे त्यांचा निसटता पराभव झाला. त्यांच्या समोरील काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार जयकुमार गोरे हा अट्टल गुंड मनुष्य. तुरूंग आणि गोरे यांचे अतूट नाते आहे. IPS कृष्णप्रकाश यांनी या गोरे महाशयांना राजकीय दबाव झुगारून तुरूंगात डांबले होते. त्यांच्यावरील गुन्ह्यांची मालिका पाहिली तर हा माणूस देशद्रोही वाटेल. अशा एका गावगुंडाविरोधात निवडणूक लढविणे सोपे नाही. गावगुंड ज्या भानगडी करू शकतो ते प्रकार देशमुख साहेबांसारख्या सज्जन माणसाला करता येणे शक्य नाही.
काळाचा उलटा महिमा बघा. हा गावगुंड जयकुमार गोरे आता देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत आहे. गोरे यांनी त्यांच्या माण तालुक्यात ३०-४० लोकांना टार्गेट केले आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे. अनेक अधिकाऱ्यांचे करिअर बरबाद करणे. आपल्या घाणेरड्या बाबींवर बोट ठेवणाऱ्या लोकांना त्रास देणे. त्यासाठी प्रशासनाचा साम, दाम, दंड, भेद या पद्धतीने वापर करणे. अशा मार्गांचा अवलंब जयकुमार गोरे करतो. आणि या भिकारवृत्तीच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे – पाटील ऐकतात. गृह खाते व महसूल खात्याचा त्याला हवा तसा वापर करून देतात. हा फारच विनोदी प्रकार आहे.
जनतेच्या विकासासाठी देवेंद्र फडणविसांनी प्रभाकर देशमुखांना योजना डोक्यावर घेतल्या हे कौतुकास्पद आहे. पण लोकांचे बळी घेण्यासाठी गुंड असलेल्या जयकुमार गोरेला गृह विभागाचा हवा तसा वापर करून देणे हा प्रकार फारच गलिच्छ आहे. असो. जयकुमार गोरे हा या लेखाचा विषय नाही.
‘थर्टी फर्स्ट’ हा दिवस चंगळवाद आणि भोगवादाने बरबटलेला आहे. पण या दिवसाचा वापर जनहिताच्या कामासाठी करणारा एक अधिकारी आहे. ते सांगणे हा या लेखाचा हा मूळ हेतू आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रभाकर देशमुख दरवर्षी ३१ डिसेंबर व १ जानेवारी हे दोन्ही दिवस रायगडावर घालवतात. मॉ. जिजाऊ व शिवरायांच्या समाधीची फुलाने सजावट करतात. १ जानेवारी रोजी किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जेवण देतात. हा सगळा खर्च ते स्वतःच्या खिशातून करतात.
उद्याच्या ‘थर्टी फर्स्ट’साठी मी सुद्धा आवर्जून रायगडावर जाणार आहे. मधले तीन – चार वर्षे मी तिकडे गेलो नव्हतो. त्यामुळे रायगडाच्या विकासाचे काम व्यवस्थित चालले आहे की, त्यात गडबड आहे हे सुद्धा पाहता येईल.
आता थांबतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी