25 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरसंपादकीयविद्यमान संकटातूनच उद्धव ठाकरे शिवसेनेला मजबूत करतील

विद्यमान संकटातूनच उद्धव ठाकरे शिवसेनेला मजबूत करतील

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पलायन केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे चित्र दिसत आहे. परंतु शिंदे यांचे हे बंड केवळ एक बुडबुडा असून तो फार काळ टिकण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना तावून सुलाखून पुन्हा नव्याने मजबूतपणे उभी राहील, असे चित्र दिसत आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या पदावर जावून बसले आहेत. त्यांच्या सोबत अनेक आमदार, खासदार गेले आहेत. नगरसेवक व इतर पदाधिकारीही त्यांच्याकडे वळत आहेत. असे असले तरी त्यांच्यासोबत गेलेले सगळेजण संधीसाधू आहेत. एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतच्या सगळ्या संधीसाधूंबद्दल जनमाणसांमध्ये नाराजी आहे. सोशल मीडियात या सगळ्या संधीसाधूंची हेटाळणी केली जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले आहे, अशी सामान्य लोकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले असतानाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या महत्वकांक्षी स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशीही भावना जनतेमध्ये आहे.

शिवसेनेतून पलायन करताना शिंदे यांनी जनभावना लक्षात घेतली नाही, हा त्यांच्या विरोधातील सर्वात मोठा मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनतेमध्ये सहानुभूतीची लाट आहे.एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता ठाण्याच्या पलिकडे नाही. त्यांना प्रभावी भाषण करता येत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ते ताईत होऊ शकतील एवढा प्रभाव त्यांना दाखवता येणार नाही. ते अभ्यासू नेते नाहीत, या शिंदे यांच्या ठळक नकारात्मक बाबी आहेत.शिवाय बिल्डर, कंत्राटदार यांच्यासोबत गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे यांचे नाते दृढ झालेले आहे. या धनदांडग्यांची कामे करून द्यायची आणि त्या बदल्यात अमाप माया ओरपायची ही शिंदे यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पण ही जमेची बाजू जनतेला न आवडणारी आहे.

‘शिंदे यांना वापरायचे व नंतर फेकून द्यायचे’ ही भाजपची भविष्यातील रणनिती असणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे भविष्यातील राजकीय स्थान संपलेले असेल किंवा ते आकुंचित झालेले असेल, असे चित्र दिसत आहे.शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला असला तरी गेल्या २० ते २५ वर्षात उद्धव ठाकरे यांनी या पक्षाला उत्तम नेतृत्व दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्रे आली तेव्हा नारायण राणे व राज ठाकरे हे दोन्ही मातब्बर नेते शिवसेनेतून बाहेर पडले होते. तेव्हा जनभावना राणे व राज ठाकरे यांच्या बाजूने होती. घराणेशाहीच्या मुद्द्यावर जनता उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होती. पण नंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांनी आपली क्षमता व नेतृत्व गुण सिद्ध केले. नेता म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची मने जिंकली. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केले.

पक्षप्रमुख असो किंवा मुख्यमंत्री असो, दोन्हीही ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली.
वाईटातील वाईट परिस्थितीसुद्धा प्रभावीपण ते हाताळतात. जनतेची मने जिंकून घेतात. हे उद्धव ठाकरे यांचे आतापर्यंतचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शिवसेनेला ते पुन्हा मजबूतपणे उभे करतील, असे बोलले जात आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी