29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनबारावीच्या परीक्षांना बसतोय शिक्षकेतर कर्मचारी संपाचा फटका!

बारावीच्या परीक्षांना बसतोय शिक्षकेतर कर्मचारी संपाचा फटका!

महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचे पडसाद आता राज्यभर दिसून येत आहेत. या संपाचा फटका काही कनिष्ठ महाविद्यालयांना विशेषत: पदवी महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या बारावीच्या विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांना बसला आहे. या संपला पाठिंबा देऊन कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बारावीच्या प्रात्यक्षिकांमध्ये व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आहे, याविषयी येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शहरातील काही महाविद्यालयांनी शिक्षण मंडळाला पत्र पाठवले आहे. (Non-teaching staff strike)

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी मुंबईतील अनेक महाविद्यालयांना बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांअभावी परीक्षा घेणे कठीण असल्याचे अनेक प्राचार्यांचे म्हणणे आहे. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी परीक्षा कशा घ्याव्यात याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती प्राचार्यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून विद्यापीठांतर्गत येणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कार आंदोलनाचा फटका पदवी महाविद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांनादेखील बसला असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात महाविद्यालयांना अडचणी येत आहेत. मुंबईतील रुईया, भवन्स चौपाटी, साठ्ये, बीएनएन कॉलेज भिवंडी आदी महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या आयोजनात येणाऱ्या अडचणींविषयी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाला पत्र पाठविले आहे.

बारावी परीक्षेचे प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे विज्ञान महाविद्यालयांनी 20 फेब्रुवारीपर्यंत प्रात्याक्षिकांच्या प्रकिया सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तुकड्या तयार केल्या होत्या. दरम्यान मुंबई विद्यापीठ आणि शहरातील पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी संपात सामील झाल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बहिष्कार टाकणे आणि प्रात्यक्षिक संथ गतीने जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत, असा आक्षेप शिक्षकवर्गाने घेतला आहे.

काही महाविद्यालये प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयाच्या कामात गुंतलेले आहेत. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद करून संपामध्ये सामील झाल्यामुळे, ‘आम्ही सलग तिसऱ्या दिवशी विज्ञानाचे प्रात्यक्षिक घेऊ शकलो नाही. मुदतीपूर्वी प्रात्याक्षिक परीक्षा पूर्ण करायचे असल्याने, आता आणखी शिक्षकांची नियुक्ती केली जाईल,’ असे मुंबईतील एका महाविद्यालयाचे प्रचार्यांनी सांगितले आहे. तर विलेपार्ले येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्याने सांगितले की, बारावीचे प्रात्यक्षिक पूर्ण करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सरकारवर दबाव आणण्यासाठी संपात सहभागी झाल्याचे दिसत आहेत.

संप आणखी तीव्र होणार

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या अंतर्गत आंदोलकांनी 20 फेब्रुवारीपासून आपला संप आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान येत्या मंगळवारी 14 फेब्रुवारीला दुपारी लंच टाइममध्ये ही निदर्शने करण्यात येणार आहे. तसेच 15 फेब्रुवारीला काळ्या फिती बांधून निषेध, 16 फेब्रुवारीला एकदिवसीय लाक्षणिक संप आणि 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सरचिटणीस माधव राऊळ यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे-फडणवीस यांच्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने बैठकीच्या सूचना

विद्यार्थ्यांनो सावधान! १०- १२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास होणार कठोर शिक्षा

मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात अडचणी येत असल्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. अद्याप कोणत्याही महाविद्यालयाकडून प्रात्यक्षिक परीक्षा बंद असल्याचे कळविण्यात आलेले नाही, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी