शाहरुख खानची बायको गौरी खान ही प्रसिद्ध सेलिब्रिटी इंटिरियर डिझायनर आहे. जुहू परिसरात तिची “गौरी खान डिझाईन्स” नावाची इंटेरियर डिझाईन स्टुडिओ फर्म आहे. (Gauri Khan Designs) संगीता को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील लीडो टॉवर्स येथे ही आस्थापना आहे. मात्र, संतापजनक बाब अशी, की मुंबईत नाव आणि पैसा कमाविणारी ही मंडळी इथल्या मराठी भाषेचा दुस्वास करताना दिसतात. शाहरुख खानच्या बायकोनेही मराठीची ऐसीतैशी केली आहे. आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात, या महाराष्ट्रातील मूलभूत नियमाला या धनदांडग्यांनी फाट्यावर मारले आहे.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या तक्रारीवरून चार दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या आस्थापनेला याच विषयावरून नोटीस बजावली गेली आहे. ईडीच्या बॅलार्ड इस्टेट कार्यालयात फक्त हिंदी आणि इंग्रजीतच फलक आहे. त्यामुळे मुंबई शहर उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी ईडीला नोटीस पाठवून त्रिभाषा सुत्रानूसार मराठी फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, “गौरी खान डिझाईन्स”चा मराठीबाबत तिटकारा संतापजनक आहे.
भारतातील सर्वात महागडे आणि जगातीलही दुसरे महाग घरांपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या प्रसिद्ध घराचे इंटिरियर डिझाईन केल्यापासून गौरी खान चांगलीच नावारूपाला आली आहे. मुकेश अंबानी रेसिडेंस असलेल्या अँटिलियाचे गौरी खानने केलेले डिझाईन नीता अंबानी यांना इतके आवडले, की त्या सर्वांना “गौरी खान डिझाईन्स”ची शिफारस करतात. तेव्हापासून गौरी खान हे इंटीरियर डिझाईनिंग इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव झाले आहे. अर्थात त्यात्यापूर्वीही गौरीने करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, रणबीर कपूर, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासारख्या सेलिब्रेटींसाठी इंटिरियर डिझाईन केले आहे. आलिया भट्टची व्हॅनिटी व्हॅन, करण जोहरचे भव्य पेंट हाऊस टेरेस, रणबीर कपूरचे बॅचलर पॅड आणि जॅकलीन फर्नांडिस व सिद्धार्थ मल्होत्राची आलिशान घरे गौरी खानने सजविली आहेत. याशिवाय, लोढा समूहाच्या साथीने तिने ट्रंप टॉवरमधील सॅम्पल फ्लॅट तिने डिझाईन केला. तिच्या क्षेत्रात ती चांगले काम करीत असली तरी ज्या मुंबईत ती राहते, त्या मातीतील नियम आणि तिथल्या भाषेचा मान-सन्मान ती पायदळी तुडवित आहे.
गौरी खानची जुहूमधील “गौरी खान डिझाईन्स”चा फलक फक्त इंग्रजी भाषेत आहे. मराठी फलक आजिबात लावण्यात आलेला नाही. नियमानुसार, राज्यातील सर्व आस्थापनांच्या पाट्या सरसकट मराठी भाषेत असायला हव्यात. याच वर्षी उद्धव ठाकरे सरकारने कायद्यात दुरुस्ती करून सर्व पळवाटा बंद केल्या आहेत. मराठी – देवनागरी लिपीतील अक्षरे ही इंग्रजी किंवा अन्य भाषेपेक्षा लहान असणार नाहीत, अशी सुधारणा ठाकरे सरकारने यासंदर्भातील कायद्यात केली होती. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने आणि आस्थापणांना असलेली मराठी पाट्या न लावण्याची आतापर्यंतची सूटही रद्द झाली आहे. न्यायालयानेही सरकारचा निर्णय योग्य ठरविला आहे. तरीही शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यासारखी माणसे मराठीचा सन्मान करायला तयार नाहीत.
हे सुद्धा वाचा :
दुकानांच्या पाट्यांवर ‘मराठी’ होणार मोठी, इंग्रजी होणार छोटी; मंत्री सुभाष देसाईंचा दणकेबाज निर्णय
मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या विरेन शहाला न्यायालयाचा चाप
कोणत्याही दुकान, आस्थापना, कंपनी यांच्या पाट्या, त्यावरील नावे यासाठी, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम हा कायदा आहे. त्यात वेळोवेळी सुधारणाही केल्या गेल्या आहेत. त्यानुसार, फलकांवरील मराठी अक्षरांच्या उंचीबाबतही धोरण निश्चित आहे. दुकाने, आस्थापनांना मराठीसोबतच अन्य भाषेत म्हणजे इंग्रजी किंवा इतर भाषेत पाटी लावता येणार असली तरी, मराठी भाषेतील पाटी आधी असायला हवी. तसेच मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. फलकावरील भाषा, फॉन्टचा आकार व अन्य संबंधित बाबींची पूर्तता तर सोडाच, गौरी खानने आपल्या “गौरी खान डिझाईन्स” या फर्मच्या नाम फलकात मराठीचा म सुद्धा वापरलेला नाही. या मंडळींना मुंबईत राहून पैसा आणि प्रसिद्धी हवी असते; पण मराठीचा सन्मान करायला नको, ही मग्रूरी व मुजोरी येथे कुठून, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

