28 C
Mumbai
Monday, March 17, 2025
Homeमंत्रालयधर्मरावबाबा आत्रामांची जबराट मोहीम, अन्नात घाण करणाऱ्या 'नासक्या आंब्यांना' चुन चुनके...

धर्मरावबाबा आत्रामांची जबराट मोहीम, अन्नात घाण करणाऱ्या ‘नासक्या आंब्यांना’ चुन चुनके…

खबरदार… हा इशारा दिला आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आणि हा इशारा दिला आहे अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना नासक्या आंब्यांना. सणासुदीच्या दिवसांत मिठाईसह खवा, मावा, खाद्यतेल, वनस्पती, तूप इत्यादी पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. नेमकी हीच संधी साधून काही गल्ला भरण्यासाठी ग्राहकांच्या जीवावर उठतात आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करतात. त्याचे परिणाम ग्राहकांना भोगावे लागतात. हे लक्षात घेऊनच धर्मरावबाबा आत्राम यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच भेसळखोरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आताही दिवाळीच्या कालावधीत भेसळीची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याचवेळी त्यांनी भेसळखोरांवर कडक कारवाईचाही इशारा दिला आहे.

दिवाळीला आता काही दिवस उरले आहेत. लोक सणासुदीसाठी विविध पदार्थ बनवतात. त्यासाठी बाजारातून खवा, तूप, मावा, खाद्यतेल आदी विकत आणतात. परंतु ग्राहकांना भेसळयुक्त काही मिळता कामा नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. प्रशासनाने अन्न आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम डिसेंबरपर्यत सुरूच राहील. यात उत्पादकांपासून किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. जे दुकानदार किंवा उत्पादक कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात केली जाईल, असा इशाराच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहेत. या इशाऱ्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

मिठाई ट्रेच्या दर्शनी भागावर वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, अन्नपदार्थ तयार करताना उत्पादकाची जागा स्वच्छ आणि आरोग्यदायी असावी, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावा तसेच त्यांची खरेदी बिले जपून ठेवावीत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. याशिवाय भांडी स्वच्छ असावीत, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी चांगल्या पाण्याचा वापर करावा, अन्नपदार्थ स्वच्छ तसेच सुरक्षित ठिकाणी साठवावेत, कर्मचारी त्वचारोग आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावेत, याची काळजी घ्यावी तसेच मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्यरंगाचा १०० पी.पी.एम. एवढा मर्यादित वापर करावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणून करू नये. विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलावर एस.एस.एस.ए.आय. परवाना क्रमांक नमूद करावा, विक्रेत्यांनी दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा या नाशवंत पदार्थांची वाहतूक योग्य तापमान असलेल्या वाहनातून सुरक्षित करावी. हे नियम दुकानदार किंवा उत्पादक पाळत नसतील तर ग्राहक याची सविस्तर माहिती प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

हे ही वाचा

सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा, थेट हिवाळी अधिवेशनावर काढणार मोर्चा!

मराठा आरक्षणावरून सातारा जिल्ह्यातील ‘या’ नेत्यांना गावबंदी

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची पोस्टिंग कुठे?

विशेष म्हणजे दीड महिन्यात म्हणजे गणपती तसेच नवरात्रीच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने 83 कारवाया करून 2 लाख 42 हजार 352 किलो भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. ज्याची किंमत साडेचार कोटींहून अधिक आहे. त्याचबरोबर गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावर ४६ ठिकाणी कारवाया करून सुमारे 3 कोटी 6 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी