33 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमहाराष्ट्रदु:खद निधन : हौसाबाई मल्हारी खरात यांना देवाज्ञा !

दु:खद निधन : हौसाबाई मल्हारी खरात यांना देवाज्ञा !

स्वातंत्र्यानंतर दुष्काळ, पाणी टंचाई अशा अनेक आपत्ती माण - खटाव तालुक्याने पाहिल्या. या आपत्तीमध्येही पती मल्हारी खरात, सासरे निळू खरात, सासू चिंगूबाई खरात यांच्यासोबतीने हौसाबाई खरात यांनी कष्ट उपसले. प्रपंच कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. स्वतः जसे कष्ट उपसले तसे आपल्या लेकरा बाळांवर कष्ट उपसण्याची वेळ येवू नये यासाठी त्या नेहमी दक्ष असायच्या.

ब्रिटीश काळात जन्माला आलेल्या व लग्नानंतर जीवनातील विविध आर्थिक चढउतार पाहिलेल्या, त्यातून आलेल्या अनुभवातून आपली मुले – नातवंडे व नंतरच्या पिढीवर अत्युच्च संस्कार करणाऱ्या हौसाबाई मल्हारी खरात यांना0 आज देवाज्ञा झाली. त्यांचे वय अंदाजे ९५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, दोन मुली, पाच सूना, दोन जावई, २१ नातवंडे, आठ नातजावई, १७ परतवंडे असा ७५ पेक्षा जास्त लोकांचा मोठा गोतावळा आहे.

Hausabai Kharat sad demise
धाकटी लेक सखुबाई व थोरली लेक रत्नमाला

निवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव खरात, सामाजिक कार्यकर्ते मधूकर खरात व उद्योजक सदाशिव खरात यांच्या त्या आई होत. ‘लय भारी’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात व प्रा. उत्तम खरात यांच्या त्या आजी होत. तुषार खरात यांच्या प्रगतीमध्ये आजी हौसाबाई खरात यांचा फार मोठा वाटा आहे.

Hausabai Kharat Sad Demise
मुलगा मधूकर खरात व नात ऐश्वर्यासोबत

हौसाबाई खरात मनमिळावू होत्या. लोकांना मदत करणे, संकटात धावून जाणे असा त्यांचा स्वभाव होता. माणसे जोडण्याची त्यांच्याकडे कला होती. त्यामुळे माण व खटाव तालुक्यात (सातारा जिल्हा) त्यांचा हिंचचिंतक वर्ग फार मोठा आहे.
हौसाबाई खरात संपूर्णत: निरक्षर होत्या. स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीची फळे बहुजन वर्ग व अठरा पगड जातीच्या लोकांपर्यंत पोचण्यास अवकाश होता. त्यावेळी हौसाबाई खरात निरक्षर असून सुद्धा त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले. आपल्या सगळ्या मुलांना सक्तीने शिक्षणासाठी त्यांनी पाठवले.
खरात कुटुंबियांचा मुळचा व्यवसाय हा मेंढपाळ, गाई – म्हैशी पालन, शेती हा होता. दुभत्या जनावरांची मोठी संख्या खरात कुटुंबियांमध्ये होती. या दुधाचा वापर विक्रीसाठी न करता आपली मुले, नातवंडे यांच्यासाठी दुध, तूप, लोणी देण्यासाठी केला. शेतीतून पिके घ्यायची व मुले – नातवंडांना सकस आहार द्यायचा यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले.
मुला – नातवंडांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांचे करिअर चांगले घडावे, सगळ्यांवर चांगले संस्कार घडावेत यासाठी त्यांनी आयुष्यभर कटाक्षाने लक्ष दिले.

Hausabai Kharat sad demise
नातू अनिकेत व नात मयूरीसोबत

स्वातंत्र्यानंतर दुष्काळ, पाणी टंचाई अशा अनेक आपत्ती माण – खटाव तालुक्याने पाहिल्या. या आपत्तीमध्येही पती मल्हारी खरात, सासरे निळू खरात, सासू चिंगूबाई खरात यांच्यासोबतीने हौसाबाई खरात यांनी कष्ट उपसले. प्रपंच कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. स्वतः जसे कष्ट उपसले तसे आपल्या लेकरा बाळांवर कष्ट उपसण्याची वेळ येवू नये यासाठी त्या नेहमी दक्ष असायच्या.

Hausabai Kharat Sad demise
नातू श्रवण व राहूलसोबत

हौसाबाई खरात यांच्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर डॉक्टर संजय तारळेकर (सुश्रूषा रूग्णालय, नेरूळ) यांनी यशस्वी शस्त्रक्रीया केली होती. सामान्यतः अशी शस्त्रक्रिया झालेले रूग्ण सात – आठ वर्षे जगतात. परंतु हौसाबाई खरात त्यानंतरही १४ वर्षे जगल्या. ‘आजी तुम्ही इतक्या वर्षानंतरही कशाकाय जिवंत आहात,’ असे डॉ. तारळेकर आश्चर्याने म्हणायचे. त्यावर ‘डॉक्टर तुमच्यामुळेच मी जिवंत आहे. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात आणि तुम्हीच मला असा प्रश्न विचारताय,’ अशा हौसाबाई म्हणायच्या.

Hausabai Kharat sad demise
शेतीसोबत आयुष्यभर नाते जपले, त्यासाठी कष्ट उपसले

विशेष म्हणजे, अखेरच्या श्वासापर्यंत हौसाबाई यांचे हृदय शाबूत होते. परंतु पंधरवड्यापूर्वी अचानक पोटाचा विकार उद्भवला. वार्धक्यामुळे या विकारावर शस्त्रक्रीया करणे शक्य नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अन्नाचा एकही कण न घेता हौसाबाई यांनी तब्बल १५ दिवस मृत्यूशी झूंज दिली. २३ फेब्रुवारी रोजी रात्री २.०१ वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला, त्यापूर्वी काही मिनिटे अगोदर स्वतःचा चेहरा स्वतःच्या हाताने स्वच्छ केला. ‘मी आता जाते…’ असे त्यांनी उच्चार केले.
घर, घरातील वस्तू इथंपासून व्यक्तीगत स्वच्छतेकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचे. अखेरचा श्वास घेतानाही स्वतःची स्वच्छता करण्यास त्या विसरल्या नाहीत. निधनापूर्वी काही क्षण अगोदर त्यांना उलट्या झाल्या. त्यावेळीही त्यांनी स्वतःच्या हाताने भांडे हातात धरले. रूमालाने चेहरा साफ केला. तोंड कडवट राहू नये म्हणून मध मागून घेतला.
शेवटच्या काही दिवसांपासून अखेरचा श्वास घेईपर्यंत हौसाबाई यांचे पाच पुत्र, पाच सूना, दोन मुली, नातवंडे, नणंद, भावजय त्यांच्या सोबत होते. हौसाबाई यांची सेवा सर्वजण करीत होते. पण तरीही स्वतःची स्वच्छता स्वतःच करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
गेल्या २० – २५ वर्षांत हौसाबाई यांच्यावर विविध उपचार झाले होते. तरीसुद्धा कुटुंबियांनी उत्तम सांभाळ केल्यामुळे त्यांचे आरोग्य खणखणीत होते. त्यांच्या सुना मंजुषा मधूकर खरात, ताई सदाशिव खरात यांनी आईप्रमाणे आपल्या सासूची सेवा केली. साहेबराव खरात, मधूकर खरात आणि सदाशिव खरात यांनी उपचारासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही.
हौसाबाई खरात यांच्यावर गुरूवार (ता. २३ रोजी) पांढरवाडी, ता. माण, जि. सातारा या ठिकाणी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी