31 C
Mumbai
Tuesday, February 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमोदी-शाहांचे खासमखास, गुजरात दणदणीत जिंकवून देणाऱ्या सीआर पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा गावच्या...

मोदी-शाहांचे खासमखास, गुजरात दणदणीत जिंकवून देणाऱ्या सीआर पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा गावच्या निवडणुकीत पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता पाठींबा; मात्र भाजपच्याच उमेदवारांनी पॅनल पाडले; सीआर पाटील यांच्या लेकीच्या विरोधातील पॅनलवाला मातब्बर भाजप नेत्याचा उजवा हात, अनेक गावात भाजप विरुद्ध भाजप पॅनल निवडणुका!

मोदी-शाहांचे खासमखास असलेले आणि भाजपला गुजरात दणदणीत जिंकवून देणाऱ्या सीआर पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा गावच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. (Bhavini Patil Panel Defeated) गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या पाटील यांच्या कन्येचे पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाले आहे. त्यांच्या लेकीला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला होता. मात्र, मातब्बर भाजप नेत्याचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्यानेच विरोधात पॅनल उभे करून त्यांचे उमेदवार धक्कादायकरित्या पाडले. आश्चर्य म्हणजे, अनेक गावात भाजप विरुद्ध भाजप निवडणुका झाल्या.

सीआर पाटील यांच्या कन्या गेली 5 वर्षे लोकनियुक्त सरपंच होत्या. यावेळी त्यांच्या पॅनलविरोधात भाजपचेच पॅनल उभे राहिले होते. एका मातब्बर भाजप नेत्याचा सीआर पाटील यांच्या कन्येच्या विरोधातील भाजप पॅनलला छुपा पाठिंबा होता, असे सांगितले जाते. पक्षाला गुजरात दणदणीत, खणखणीत जिंकवून देणाऱ्या सीआर पाटील यांना गावच्या निवडणुकीत लेकीचे पॅनल जिंकवून देता आले नाही. राजकीय वर्तुळात हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्याच लोकांनी पाटील यांच्या लेकीचा घात केला. स्वतः मोदी-शाह हेही पाटील यांच्या कन्येचा ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाणून घेण्यास इच्छुक होते. या निकालाने त्यांनाही धक्का बसला, असे भाजप कार्यकर्ते सांगत आहेत.

मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले आणि गुजरातेत खान्देशी कर्तृत्त्वाचा डंका वाजविणारे सीआर पाटील यांना त्यांच्या गृह जिल्ह्यानेच दगा दिला आहे. सध्याच्या सरकारात मंत्री असलेल्या, ज्येष्ठ भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात भाजपाच्या देशातील मातब्बर नेत्याच्या लेकीच्या पॅनलचा पराभव झाला आहे. मंत्री महाजन यांच्यासाठीही ही लज्जास्पद बाब ठरली आहे. खडसे भाजपातून वजा झाल्यावर जळगाव जिल्ह्यात महाजन हेच भाजपचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचा शब्द जिल्ह्याच्या राजकारणात अंतिम मानला जातो. जामनेर तालुक्यात तर महाजन यांच्याशिवाय पानही हलत नाही, असे त्यांचे समर्थक म्हणतात. मग आपल्या पीएला जळगाव दूध संघात संचालक म्हणून निवडून आणणारे महाजन हे मोदी-शाहांच्या खासमखास अशा पक्षातील मातब्बर व्यक्तीच्या लेकीच्या पॅनलविरोधात आपल्या प्रभाव क्षेत्रात भाजपचेच दुसरे पॅनल कसे उभे राहू देतात, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे विरोधात पॅनल उभा करणारा कार्यकर्ता हा महाजन यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते.

सुरतमधील खासदार सी.आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या पाच वर्षे जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे लोकनियुक्त सरपंच होत्या. यावेळी त्या पॅनलसह निवडणूक रिंगणाात होत्या. मात्र, त्यांच्यासमोर भाजपचेच, गिरीश महाजन यांचे खास मानले जाणारे प्रा. शरद पाटील यांनी पॅनल उभे केले होते. सरपंच पद राखीव असल्याने भाविनी पाटील सदस्य पदासाठी निवडणूक लढवत होत्या, तर सरपंच पदासह त्यांचे पूर्ण पॅनल उभे होते. मात्र, त्या स्वत: निवडून आल्या तरी त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलचे दहापैकी फक्त तीन सदस्य निवडून आले. गिरीश महाजन यांचे उजवा हात असलेले प्रा. शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनल म्हणजेच भाजपच्या पॅनलच्या सहा जागा निवडून आल्या. चंद्रकला रघुनाथ कोळी या भाजपच्या लोकनियुक्त सरपंचही विजयी झाल्या.

भाविनी पाटील यांच्या विरोधातील आपल्या कार्यकर्त्यांच्या पॅनलने माघार घ्यावी, यासाठी गिरीश महाजन यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांनी सांगितले असते तरी सहजपणे प्रा. पाटील यांनी माघार घेतली असती. मात्र, भाविनी पाटील या राजकारणात मोठ्या झाल्या तर मोदी-शाहांचे खास असलेल्या गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांना जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्व येऊ शकते. कदाचित त्यामुळे गिरीश महाजन हे त्यांना राजकीय सहकार्य करत नसावेत, अशी दबकी चर्चा सुरू आहे. अर्थात, महाजन यांचे कार्यकर्ते मात्र हे अगदीच गावकीचे राजकारण असल्याने माध्यमांनी यात कुठलाही अन्य अॅंगल शोधू नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातच काय तर जामनेर तालुक्यातच अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप लढती होत असल्याकडे या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी कार्यकर्ते मात्र वेगळीच माहिती देतात. त्यांच्या मते, भाजप विरुद्ध भाजप लढती घडवून आणल्या तर महाजनांना हात वर करून अलिप्त राहता येते. त्यामुळे आर्थिक खर्चही वाचतो. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली तर महाजन यांना आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

हे सुद्धा वाचा  : 

VIDEO : ग्रामपंचयात निवडणुकांतील अंधश्रद्धा

Bhagat Singh Koshyari : ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव, राज्यपालांना हटवा!

एकनाथ खडसे गटाने कशीबशी जिंकली कोथळी ग्रामपंचायत

महाजन यांच्यावर अनेकदा जिल्ह्यातील मराठा नेत्यांचे राजकारण संपविल्याचे आरोप होतात. खासदार सी.आर. पाटील यांचे उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारोळ्याच्या एटी नाना पाटील यांच्यासंबंधी जुनी खासगी क्लिप नेमकी निवडणूक काळात व्हायरल करून त्यांचा राजकीय गेम वाजविला गेला. त्यावेळीही महाजन यांच्याकडे संशयच्या चर्चेचे रोख वळविले जात होते. त्यावेळी पाटील संपले नसते तर कदाचित जिल्ह्याच्या राजकारणात आज ते महाजन यांच्याइतकेच प्रभावी, सशक्त राहू शकले असते. दुसरीकडे, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे दाखवणार असलेली बहुचर्चित सीडी आजवर बाहेर आलीच नाही. अर्थात खडसे दावा करत असलेला भूकंपही अजून झालेला नाही. त्यांना माहिती असलेल्या बऱ्याच गोष्टी राजकारणात इतकी उलथापालथ होऊनही ते अजून उघड का करत नाहीयेत, हे कोडेच आहे. वेळ निघून गेल्यावर भूकंप झाला तर त्याचे धक्के जाणवणारच नाहीत. सीडीतील औत्सुक्यही तोवर संपलेले असेल. हे झाले खडसेंचे! त्यांची सीडी गुलदस्त्यात असली तरी एटी नाना पाटील यांची क्लिप मात्र योग्यवेळी पसरविली गेली. त्यात पाटील यांचा राजकीय बळीही गेला. त्यावेळी सी.आर. पाटील यांनी एटी नाना यांची बाजू लावून धरली होती. तो हिशेब तर आता चुकता केला गेला नसेल ना? तसे असेल तर मराठा प्यादे हाताशी घेऊनच महाजन यांनी सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचा गेम केला, असे म्हणावे लागेल. प्रा. शरद पाटील हे मराठा असले तरी महाजन यांना डोईजड होणार नाहीत. भाविनी पाटील मात्र दिल्लीच्या आशीर्वादाने कधीही महाजन यांना मागे सारून पुढे जाऊ शकतात.

हा सारा तसा जर-तरचा खेळ आहे. अर्थात शक्यतांची समीकरणेच मांडायची, तर राजकारणात काहीही होऊ शकते. गावचे सरपंचपदच काय, मोदी-शाहांनी मनावर घेतले तर ते भाविनी पाटील यांना जळगाव काय, अगदी जामनेरमधूनही आमदार करू शकतात. झालेच तर स्मिता वाघ यांच्यासारखे विधानपरिषदेवरही घेऊ शकतात. गुजरातसाठी जीवाचे रान करून मोदींच्या पदरात भरभरून यश घालणाऱ्या खासदार पाटील यांनी उद्या लेकीसाठी काही मागितलेच तर ते मोदी-शाह नाकारतील तरी कसे? या झाल्या भविष्यातल्या शक्यता. मात्र, तूर्तास तरी गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचा गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात राजकीय गेम झाला आहे. भलेही गावकीचे राजकारण असेल; पण महाजन यांचेच उजवा हात असलेले भाजपचे प्रा. शरद पाटील यांनी भाजपमधील एव्हढया मातब्बर लेकीचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनांना काय बक्षिसी देतात, ते पाहणे रंजक ठरेल.

Bhavini Patil Panel Defeated, Daughter of Gujrat BJP President CR Patil, Jamner Girish Mahajan Political Game, सीआर पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा गावच्या निवडणुकीत पराभव

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी