26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रशिवरायांसोबत बाबासाहेब पुरंदरेंचे शिल्प; कारवाई करा, अन्यथा सुट्टी नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा

शिवरायांसोबत बाबासाहेब पुरंदरेंचे शिल्प; कारवाई करा, अन्यथा सुट्टी नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा

पुण्यातील बालगंधर्व रंगमदीरच्या प्रवेशव्दारावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिल्प ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवप्रेमी, इतिहाससंशोधकांकडून त्याचा जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. बालगंधर्व रंगमंदीरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हे शिल्प तेथे ठेवण्यात आले होते. या शिल्पाचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी निषेध व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता तथा संघटक संतोष शिंदे यांनी देखील याप्रकरणी पुणे महापालिकेला संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा असे सुनावले आहे.

संतोष शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्व: कर्तृत्त्वावर राजे झाले, छत्रपती झाले. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी घेतले तरी ३३ कोटी देवांची पलटण बाद होते. एवढी ताकद छत्रपती शिवाजी या नावामध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर आय़ुष्यभर ज्यांनी जोगवा मागितला हजारो कोटी कमवले, आणि एक विशिष्ट प्रकारची मांडणी शिवरायांच्या चरित्रासोबत वादग्रस्त पद्धतीने केली, ज्यांनी शिवरायांची बदनामी केली त्याच बाबासाहेब पुरंदरे यांचे शिल्प बालगंधर्व रंगमंदीरात प्रवेशव्दारावर ठेवणे आणि तिथे लोकांना प्रदर्शनामध्ये हे सगळे दाखवणे हे शिवप्रमेमींच्या भावना भडकविणारे आणि वेदनादायी चित्र आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रशासनाने कशी काय परवानगी दिली या वादग्रस्त शिल्पाला असा सवाल करत शिवाजी महाराज आणि पुरंदरे हे काय मित्र आहेत का? संवंगडी आहेत काय ? त्यांनी काय सोबत काम केलयं का? पुरंदरेंची पात्रता काय? असे सवाल केले. ज्या जिजाऊंच्या चारित्र्याबद्दल ज्या शिवरायांच्या चारित्र्याबद्दल पुरंदरेंनी अत्यंत काल्पनिक पद्धतीने मांडणी केली, ती वादग्रस्त आहे. पुरंदरे हयात होते तरी आम्ही विरोध केला. कारण त्यांनी मांडलेले शिवचरित्र हे वादग्रस्त होते. त्यांना ते बदलावे लागले एवढी ताकद खऱ्या इतिहासात आहे, असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

संतोष शिंदे म्हणाले की, आता पुरंदरे हयात नाहीत तरी देखील काही माणसे खोडसाळपणे शिवाजी महाराज आणि पुरंदरेंची तुलना करतात, हा सांस्कृतिक करंटेपणा आहे. आम्ही शिवप्रेमी हे खपवून घेणार नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या शिल्पाचा निषेध व्यक्त करतो. पुणे महानगर पालिकेने बालगंधर्वचे जे व्यवस्थापक आहेत त्यांनी तात्काळ हे शिल्पाला कशी परवानगी दिली त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा संभाजी ब्रेगड हे खपवून घेणार नाही.

संतोष शिंदे म्हणाले की, आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करुच, पण हे बीज जाणिवपूर्वक का पेरले जात आहे? अगोदर शिवाजी महाराजांना चार हात असल्याचे चित्र याच पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आले होते. २००२ मध्ये आम्ही ते बंद पाडले. मागच्या काही वर्षांमध्ये पुरंदरेंच्या हयातीमध्ये सुद्धा मुंबईच्या आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन झाले होते. शिवाजी महाराजांना चार हात दाखवून त्यांचे कर्तृत्व जे महान आहे ते दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे सुद्धा वाचा
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही माहिती अधिकार कायद्याचा बट्ट्याबोळ, कार्यकर्त्यांचे राज्यपालांना साकडे
ठाण्यातील ‘हा’ देखणा घुमट कोणी बनविला ? जाणून घ्या वैशिष्ट्ये
जन धन योजनेला झाली 9 वर्षे; सरकार खाते धारकांना या सुविधा पुरविण्याच्या तयारीत

आता कुठे आहेत ते मनुवादी जे स्वत:ला फार मोठे हिंदुत्त्ववादी समजतात, अरे शिवरायांची बदनामी तुमच्या डोळ्यासमोर होतेय आणि मुग गिळून तुम्ही गप्प बसता. बसवायचेच असतील तर तुमच्या घरात बसवा परंतू सार्वजनिक ठिकाणी हे आम्ही खपवून घेणार नाही. तात्काळ पोलिस प्रशासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीचा सखोल तपास करावा, चौकशी करावी. महानगरपालिकेने गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही सुट्टी देणार नाही लक्षात ठेवा, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी