29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

टीम लय भारी

मुंबई :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी बिघडली होती. पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत पवारांना पित्ताशयाचे निदान झाले. सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन  शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कालपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना शरद पवार यांची अचानक इतकी काळजी का वाटू लागली, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. शरद पवार यांना राजकारणातील सर्वपक्षीय नेते मानत असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

 शरद पवार आणि अमित शाहांच्या कथित भेटीने राजकारणाचे संदर्भ बदलले’

शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील संदर्भ अचानक बदलले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार आपल्या ट्विटर हँडलवरून प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानत आहेत. मात्र, अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीविषयी त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जवळीक निर्माण झाली आहे का, असा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी