लय भारी टीम
मुंबई : शिवसेना आमदारांनी बंड पुकारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, परंतु बंडोबा गटातील उदय सामंत अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर कायम सक्रीय असणारे उदय सामंत यांनी ट्वीटरवरील उद्वव ठाकरे यांचा फोटो अजूनही कायम ठेवला आहे त्यामुळे सामंत नक्की कोणाच्या पार्टीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
शिंदे गटाच्या बंडखोरीत उदय सामंत सगळ्यात उशीरा सहभागी झाले. शिंदेगटाला त्यावेळी आपला पाठींबा दर्शवत “मी अजूनही शिवसेनेत आहे” असा व्हिडीओ त्यावेळी जारी केला. शिवाय ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत सामंत यांनी नव्या भाजप – बंडोबा युती सरकारला धारेवर धरल्याचे दिसून आले, त्यामुळे उदय सामंत यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे.
उदय सामंत बंडोबा गटात सहभागी होऊन सुद्धा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर उद्धव ठाकरे यांचा फोटो तसाच आहे, शिंदेसमर्थनार्थ कोणताच बदल दिसत नाही, त्यामुळे शिंदेगटात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सामंत यांना सांगितले होते का असा सुद्धा संभ्रम पुन्हा पाहायला मिळत आहे.
राज्यात भाजप बंडोबा युती सरकार आल्यानंतर आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, त्यामुळे कोण कोणाच्या बाजूने हे चित्र आज आणखी स्पष्ट होणार आहे. उदय सामंत अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत की बंडोबा गटासोबत हे सुद्धा यावेळी कळणार आहे.