28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी महाडमधून थेट मोदी, शाह यांच्यावर शरसंधान साधले

उद्धव ठाकरेंनी महाडमधून थेट मोदी, शाह यांच्यावर शरसंधान साधले

उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यानंतर शनिवारी (6) रोजी सायंकाळी महाड येथे त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप,पंतप्रधान मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे आणि नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा नाव न घेता खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी या सभेत बारसू प्रकल्पावरुन तेथे सुरु असलेल्या पोलीस कारवाईवर देखील सडकून टीका केली.

पाठीवर वार करुन शिवसेनापुत्राला खाली खेचले आणि स्वत: तिकडे बसले, भाजपने त्याहून निचपणा केला आपले चिन्ह चोरले आणि त्यांना दिले अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जात आहोत, मग मी काँग्रेस फोडतोय का तर तसे नाही, कारण एकजूटीने लढल्याशिवाय समोर जी हुकुमशाहीवृत्ती उभी आहे, तीचा पराभव आपण करु शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले,  आज मी बारसूला जाऊन आलो, पण विषेश म्हणजे महाड मतदार संघ आपला आहे, शिवसेनेचा, भगव्याचा आहे. आपली जी ठिकाणे आहेत त्यावर आपल्याला पाणी सोडायचे नाही.  भगव्याला कलंक लावणाऱ्यांना माहित नाही, येथे पवित्र माती आहे, त्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तानाजी मालूसरे काय निवडणुकीचे तिकीट मागायला आले नव्हते, ते रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन आले होते. त्यावेळी तुम्हाला माहित आहेच. आधी लगीन कोंढाण्याचे. आम्ही नाणारला रिफायनरी होऊन दिली नाही. मग मला दिल्लीतून फोन आला हा मोठा प्रकल्प आहे. तिथे कोणाचा विरोध नाही सांगितले त्यामुळे माझ्याकडून तसे पत्र दिले गेले. त्यावेळी सरकार पाडले. मी सांगितले होते जनतेला प्रकल्प हवा असेल तरच येईल अन्यथा हाकलून देईन असे सागितले होते. आता बारसूत घराघरात पोलीस बंदोबस्त ठेवला आहेत. तेवढा बंदोबस्त चीनमध्ये ठेवला असता तर घुसखोरी झाली नसती.

प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या का चालवताय, मी पोलिसांशिवाय जनतेत जात असेल तर तुम्ही का जात नाही. खरेच प्रकल्प चांगला असेल तर ते धाडस का दाखवत नाही. तेथील जमीनी उपऱ्यांच्या गळ्यात घातल्या. तेथील जनता जोपर्यंत मंजूरी देत नाही तोपर्यंत तेथे प्रकल्प होऊ देणार नाही. मातीची चाचणी करायची असेल तर तेथील भूमीपुत्रांची देखील चाचणी करा. जर प्रकल्प आणायचा असेल तर तेथील लोकांना का विश्वासात घेतले जात नाही. यांचे ठीक आहे खोके घेऊन मोकळे झाले, पण कोकणच्या भूमीवर उपऱ्यांचा वरवंटा का चालवत आहात असा सवाल ठाकरे यांनी केला.

तळीये गावात जी गावे दरडीखाली गेली होती. मी स्वत: तिकडे गेलो होतो.पुनर्वसन करण्यासाठी मी सगळे प्रशासन कामाला लावले होते. पण आता दोन वर्षे झाली. किती जणांना तेथे घरे मिळाली असा सवाल त्यांनी केला. तळीये येथे दोन वर्षांत १५ घरे उभारली आहेत. मी मुख्यमंत्री म्हणून अयोग्य होतो, तर दोन वर्षे झाली त्यांना घरे का मिळाली नाहीत. मुख्यमंत्री दौरे करतात पण इकडे यायचे होत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती उचापतीखोर त्यांचा बंदोबस्त करु. तेथे भाषिक अत्याचार सुरु आहे. पण आमचे मुख्यमंत्र्यांची कानडी भाषेत तेथे जाहिरात आहे. महाराष्ट्राचे मिंधे मुख्यमंत्री भांडी घासायला तिकडे जातायत, त्यांच्यात हिंमत असेल तर मराठीव्देष्ठ्या भाजपचा पराभव करा असे सांगायला हवे अशी टीका ठाकरेंनी केली.

पंतप्रधान शंभरवेळा बोलले पण तुमच्या मन की बात त्यात होती का असा सवाल ठाकरेंनी केला. अच्छे दिन आले का, १५ लाख मिळाले का असा सवाल ठाकरेंनी केला. बाळासाहेब ठाकरेंचा हिंदूत्त्वाचा प्रचार केला म्हणून मतदानाचा अधिकार काढला. पण पंतप्रधान कर्नाटकात जय बजरंगबलीचे नाव घेऊन मत द्या असे म्हणतात. तुमच्यात हिंमत नाही म्हणून तुम्हाला बजरंगबलीची आठवण झाली. ते जर बजरंगबली की जय म्हणत असतील तर तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा आणि भाजपला तडीपार करा असे ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सात न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे जाऊ शकतो का?

पवई आयआयटी : दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

काँग्रेस सोडून स्नेहल जगताप उद्धव ठाकरेंच्या गटात; आमदार योगेश गोगावलेंना आव्हान देणार

सत्यपाल मलिंकांकडे सीबीआय जाऊन आली, त्यांना देखील आत टाकतील, इतर पक्षातील मोठ्या नेत्यांवर कारवाई करायची. काँग्रेसने शिव्या दिलेल्या पंतप्रधान मोजतात पण तुमची टिनपाटे रोज बोंबलतात. राणे आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावांचा उल्लेख टाळून ते म्हणाले त्यांना बोलू द्या कारण त्यावरच त्यांचे पोट चालत आहे, असे ठाकरे म्हणाले. काँग्रेसमधून जगताप कुटुंब आपल्याकडे आले. मध्ये त्यांनी बोंब केली उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले, पण आमचे हिंदूत्व शेंडी जाणव्याचे हिंदूत्व नाही. भारतीय जनता पक्षाचे हिंदूत्व काय आहे असा सवाल करत, गोमुत्रधारी अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मेघालयात अमित शहा गेले तिकडे प्रचार केला तिकडचे सरकार सर्वात भ्रष्ट्र आहे, पण निवडणुका झाल्यानंतर त्यांच्यासोबत मांडीला मांडीलावून बसले. आमच्या साध्यासुध्या माणसांवर ईडीच्या धाडी टाकता, असे ठाकरे म्हणाले. ही वृत्ती गाडली नाही तर 2024 ची निवडणूक शेवटीची ठरेल, नड्डा म्हणाले होते देशात एकच पक्ष शिल्लक राहील पण त्यांना माहित नाही पक्ष म्हणजे एक विचार असतो. ती बिजे आता फोफावली आहेत. हिंमत असेल तर लोकसभा विधानसभा निवडणूका घेऊन दाखवा, असे आव्हान ठाकरेंनी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी