29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन वाझेंना एनआयएने ठाण्यातील घरी का आणले?

सचिन वाझेंना एनआयएने ठाण्यातील घरी का आणले?

टीम लय भारी

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) च्या पथकाने बुधवारी सचिन वाझे यांना ठाण्यातील त्यांच्या घरी आणले होते. वाझे यांना घरी कशासाठी आणले गेले होते, हे कळू शकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो, तिचा पाठलाग करणारी इनोव्हा आणि या साऱ्याचे वाझेंशी असलेल्या संबंधांचे धागे जुळवण्याचे प्रयत्न ‘एनआयए’ कडून सुरू आहेत. याचाच भाग म्हणून बुधवारी दुपारी एनआयएचे पथक वाझे यांच्या ठाण्यातील साकेत को. ऑप. हौसिंग सोसायटीतील घरी चौकशीसाठी आले होते. दुपारपासून हे पथक वाझे यांच्या घरी होते, असे सांगितले जाते.

सचिन वाझे यांनी साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेज गायब केल्याचा संशय आहे. याच अनुषंगाने चौकशी करण्यासाठी एनआयएचे पथक ठाण्यात आले असावे, असे बोलले जाते. परंतु या पथकाने नेमकी कोणाची चौकशी केली? सोसायटीतील पदाधिकाऱ्यांची चौकशी केली गेली का, याविषयी काहीच समजू शकले नाही. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एनआयएचे पथक वाझे यांनाही घेऊन त्यांच्या ठाण्यातील घरी आले होते.

एटीएसचे पथकही ठाण्यात

मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात चौकशी करणारे दहशतवाद विरोधी पथकही (एटीएस) बुधवारी ठाण्यात आले होते. एटीएसच्या ठाणे युनिटच्या कार्यालयात या पथकाने मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडे चौकशी केल्याची माहिती एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पण डॉक्टरांकडे अधिकाऱ्यांनी काय चौकशी केली, हे कळले नाही.

घडामोडींना वेग

सचिन वाझे यांची एकीकडी चौकशी सुरू असतानाच राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. वाझे प्रकरण नीट न हाताळल्याचा ठपका ठेवत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी