28 C
Mumbai
Monday, June 17, 2024
Homeमंत्रालयबोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात

बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात

राज्यातील जनतेचे आशास्थान म्हणजे मंत्रालय. राज्याचे मंत्रीमंडळ, सचिव यांच्या बसण्याची हक्काची जागा. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री कार्यालयात कायम राज्यातील अडल्या नडलेल्यांची गर्दी असते. असे असताना या कार्यालय परिसरात भुरट्यांची कमी नाही. विविध कामे करून देणारे दलाल मुख्यमंत्री कार्यालय परिसरात फिरत असतात. एखादी व्यक्ती फसवली गेली की अशा मंडळींचे बिंग फुटते.

राज्यात अनेक सरकार आले आणि गेले पण दलाल मंडळींची चलती काही कमी झालेली नाही. असे असतानाच मुख्यमंत्री सचिवालयाचे ओळखपत्र तयार करून ‘ओएसडी’ बनलेल्या एका लखोबा लोखंडेने सरकारच्या तिजोरीतून पगारही काढल्याचे निदर्शनास आले असून मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहातच त्याचे पितळ उघडे पडले आहे. मयूर ठाकरे असे या भामट्याचे नाव आहे.

अचलपूर नगरपालिकेतील तृतीयश्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे हा गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरत आहे. त्यापलीकडे सह्याद्री, वर्षा आणि नंदनवन या बंगल्यावरही त्याचा राबता होता. या ठिकाणांची नेत्यांची वर्दळ आणि त्यांच्याकडच्या कामांचे स्वरूप हेरून मयूर याने मुख्यमंत्र्यांचा ‘ओएसडी’ असल्याचे भासवले. त्याचा फायदा होत असल्याचे लक्षात येताच त्याने अचलपूर नगरपाालिकेतून थेट मंत्रालयात तेही मुख्यमंत्री सचिवालयातच रूजू झाल्याचे दाखवून दिले. त्यासाठी खोटे नियुक्तीपत्र, त्याआधी प्रतिनियुक्तीचा आदेश तयार केला. ते दाखवून तो अचलपूर नगरपालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर खास ओळखपत्रही तयार करून घेतले.

राज्यभरातील ‘आयएस’, ‘आयपीएस’
अधिकाऱ्यांना फोन करून कामे वाजवली

ही कागदपत्रे हातात ठेवून मयूर ठाकरेने मुख्यमंत्री सचिवालयात जम बसविला. त्यातून नेते, बिल्डर, ठेकेदारांच्या फायली घेऊन त्या मार्गी लावू लागला. साऱ्या यंत्रणेदेखत हे घडूनही मयूर ठाकरेबाबत कोणाला, कधीच काडीचाही संशय आला नाही. त्याला कोण्या एका अधिकाऱ्याने कधी हटकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे धाडस वाढले. राज्यभरातील ‘आयएस’ आणि ‘आयपीएस’अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून वाटेल ती कामेही करून घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातून मयूरने भौतिक प्रगती साधल्याचे बोलले जाते.

सह्याद्री अतिथिगृहातील बैठकांमध्ये मयूरची धावपळ पाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला संशय आला आणि त्यांनी मयूरकडे चौकशी केली. तिथे त्याने गडबडीत असल्याचा बहाणा करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र, अधिकाऱ्यांचा मयूरवरचा संशय बळावला आणि त्याची झाडाझडती घेतली. त्यात मयूरने सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
हे सुद्धा वाचा
ठाण्यात दहीहंडी उत्सवात १३ गोविंदा जखमी
दहीहंडीसोबत मुंबई, ठाण्यात पावसाचे आगमन!
एकनाथ शिंदेंना जरांगे-पाटील यांना भेटायला वेळ नाही, पण ३० दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती

बनावट कागदपत्रे जमविण्यापासून पगार मिळवण्यापर्यंतची अनेक कामे त्याने केली आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयात प्रचंड व्यवस्था असतानाही मयूर ठाकरे हा बनावट ओएसडी कसा झाला, हे कोणाच्या निदर्शनास कसे आले नाही, अशा प्रश्‍नांनी मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी चक्रावून गेले. परंतु, हा प्रकार उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाची अब्रू काढली जाण्याच्या शक्यतेने तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. याआधी आषाढी एकादशीलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पंढरपूर दौऱ्यातही ‘ओएसडी’ असल्याचे सांगून एका कार्यकर्त्याने पोलिसांनाच कामाला लावल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून १३ ‘ओएसडी’ असून, त्यातील प्रत्येकाकडे कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रचंड गर्दीत अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे.
हे सुद्धा वाचा
शाहरुख खानच्या ‘जवान’ने दुपारपर्यंत कमावले २० कोटी; पण….
जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी घेतली जरांगेंची भेट, मात्र आंदोलन कायम
ठाण्यात दहीहंडी उत्सवात १३ गोविंदा जखमी

मुख्यमंत्री कार्यालयातून फायली फिरवल्या
या प्रकाराने मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  आश्चर्यचकित झाले असून, यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांकडच्या सुरक्षा व्यवस्थेपासून त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेजबादारपणाकडे बोट दाखवले जात आहे. याआधीही मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून काहीजणांनी कामे उरकल्याच्या तक्रारी आहेत. त्यात आता तर थेट ‘ओएसडी’च बोगस निघाल्याने मंत्रालयातील कारभाराबाबतच उलटसुलट चर्चा आहे.

बनावट नियुक्ती पत्र, मुख्यमंत्री सचिवालयाचे ओळखपत्र तयार करून या ‘ओएसडी’नेही सरकारच्या तिजोरीतून पगारही काढल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फायली फिरवून या बहाद्दराने कॅबिनेट मंत्री, सचिव, आयुक्तांकडून ‘रिमार्क’ घेत, ‘कमाई’चे उद्योगही केल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी