28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeमुंबईCongratulations interview : मी नामर्द नाही, अंगावर याल तर हात धुऊन मागे...

Congratulations interview : मी नामर्द नाही, अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची ‘अभिनंदन मुलाखत’

टीम लय भारी

मुंबई : सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या वर्षभराच्या काळात पडलेत, असा दणका देत (Congratulations interview) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच सध्या फक्त हात धुतोय; मी नामर्द नाही, अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन, असा सज्जड दम विरोधकांना दिला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून कोरोना, कंगणा आणि इतर अनेक विषयांवर उघडपणे भाष्य केले आहे. ही मुलाखत ‘अभिनंदन मुलाखत’ नावाने प्रदर्शित करण्यात आली आहे. या प्रदीर्घ मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच विरोधकांकडून सरकारवर करीत असलेल्या आरोपांचाही कडक समाचार घेतला.

‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणा-यांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळं आहेत हे विसरू नका; पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवल्याचा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मुलाखतीतून दिला आहे.

या मुलाखतीत कोरोनापासून रोजगारापर्यंत, ‘वर्षा’ बंगल्यापासून ‘मातोश्री’पर्यंतच्या प्रत्येक प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे बोलले. काँग्रेस, राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय आहे. सरकार चालवताना कोणतीही कसरत करावी लागत नाही हे त्यांनी मान्य केले.

मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. पण तुम्ही आमच्या कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणा-यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.

तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू.

मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक गोष्ट काही लोक विसरतात की, तुम्ही जो म्हणालात तो चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली. आपत्त्या आल्या. भलेभले अंगावर आले, पण काय झालं?

माझ्या दस-याच्या भाषणात मी तेच बोललो होतो. माझ्या आजोबांच्या पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा संदर्भ दिला होता की, महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वाघाची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील आणि अशी ही संकटं अंगावर घेत पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला, महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही. कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणा-यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून महाराष्ट्राला आव्हानं देणा-यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो.

संपूर्ण देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. सध्या तर पूर्णपणे उघडपणे आणि निर्लज्जपणे तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रातही अघोरी प्रयोग सुरू झाले आहेत, असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी