33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईलोढा वर्ल्ड वन लटकली; आता ब्रिटनमधील कंपनी मुंबईत उभारणार देशातील सर्वात उंच...

लोढा वर्ल्ड वन लटकली; आता ब्रिटनमधील कंपनी मुंबईत उभारणार देशातील सर्वात उंच इमारत !

परळ-शिवडीमध्ये उभा राहणार 110 मजली टॉवर; इमारतीतच असेल थिएटर, मॉल, हॉस्पिटलसह सर्व काही. ❒︎ ❒︎ याआधीचा सर्वात उंच असलेला लोढांचा प्रोजेक्ट एअरपोर्ट ऑथरिटीची परवानगी न घेता मजल्यावर मजले चढवू पाहण्यामुळे खोळंबला.

एअरपोर्ट ऑथरिटीची परवानगी न घेता मजल्यावर मजले चढवू पाहण्यामुळे लोढा वर्ल्ड वन प्रकल्प लटकलेला असताना आता परळ-शिवडीमध्ये 110 मजली टॉवर उभा राहणार आहे. (Indias Tallest Building) मुंबईत उभी राहणारी ही इमारत देशातील सर्वात उंच असेल. ब्रिटनमधील कंपनी एसआरएएम आणि एमआरएएम ग्रुपने या अल्ट्रा-लक्झरी प्रकल्पाची घोषणा केली आहे. आधीच उंचीच्या मुद्द्यावरून लोढा वर्ल्ड वन लटकली असल्याने ब्रिटनमधील कंपनीने मजल्यांची घोषणा केली असली तरी इमारतीच्या उंचीचे रहस्य गुलदस्त्यातच ठेवले आहे.

एसआरएएम आणि एमआरएएम ग्रुपचा 110 मजली टॉवर हा परळ-शिवडी परिसरात उभा राहणार आहे. त्यासाठी जमिनीचे संपादन पूर्ण केले गेल्याचे सांगितले जात आहे. काही तांत्रिक, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच लोकेशनची माहिती सार्वजनिक केली जाणार असल्याचे बांधकाम क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. या 110 मजली इमारतीतच थिएटर, मॉल, हॉस्पिटलसह सर्व काही सुविधा असतील. व्यावसायिक, वाणिज्यिक आणि रहिवासी अशी ही बहुविध वापराची इमारत असेल. अशा प्रकारची ही मुंबईतील पहिलीच गगनचुंबी इमारत असेल.

या प्रस्तावित इमारतीत कार्यालये, दुकाने, एक मॉल, हॉटेल, 50 खाटांचे विशेष रुग्णालय, सर्व्हिस अपार्टमेंट, एक जिम आणि बँक्वेट हॉल असेल. या इमारतीत हिटेड स्विमिंग पूल, मनोरंजनासाठी रिक्रीएशन सेंटर आणि 50 आसनी आरामदायी चित्रपटगृहही असेल. प्रख्यात वास्तुविशारद व्यंकट पिल्लई हे या अतिभव्य, अलिशान अशा अल्ट्रा-लक्झरी प्रकल्पाचे डिझाईन, वास्तु-रचना करणार आहेत. “भारतात एक अतिभव्य प्रकल्प उभारण्याची आमची इच्छा होती. आता व्यंकट पिल्लई डिझाईन स्टुडिओच्या मदतीने हे स्वप्न साकार होणार आहे. आतापर्यंत केलेल्या कामातून आमची वेगळी ओळख आहेच; पण या शानदार प्रोजेक्टमुळे आम्हालाही एक नवी व्यावसायिक उंची प्राप्त होईल,” असे एसआरएएम ग्रुपने म्हटले आहे.

लोढा वर्ल्ड वन आजच्या घडीला भारतातील पूर्ण झालेली सर्वात उंच इमारत

यापूर्वी लोढा समूहाने परळमध्ये श्रीनिवास मिलच्या जागेवर जगातील सर्वात उंच रहिवासी इमारत उभारण्याची घोषणा केली होती. वर्ल्ड वन, वर्ल्ड क्रेस्ट आणि वर्ल्ड व्ह्यूज अशा एकत्रित तीन टॉवर्सचा हा प्रकल्प आहे. त्यातील वर्ल्ड वन मध्ये मूलतः 117 मजली इमारत नियोजित होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या 85 मजल्यांसाठी परवानगी प्राप्त असून 76 मजल्यांचे म्हणजे 280.2 मीटर उंचीपर्यंत (919 फूट) बांधकाम पूर्ण झालेले आहे. वर्ल्ड क्रेस्ट मध्ये व्यवसाय प्रमाणपत्रासह 52 मजले तयार आहेत. वर्ल्ड व्ह्यू ही 80 मजली नियोजित इमारत आहे. तूर्तास, या घडीला तरी आहे त्या स्थितीतही लोढा वर्ल्ड वन ही भारतातील पूर्ण झालेली सर्वात उंच इमारत आहे. तसे पाहिले तर श्रीनिवास मिलच्याच जागेत निर्माणाधीन असलेल्या पिरामल अरण्य आरव 282.2 मीटर (926 फूट) आणि पॅलेस रॉयल 320 मीटर (1,050 फूट) इमारती लोढा वर्ल्ड वन पेक्षाही जास्त उंचीच्या ठरतील. वर्ल्ड वन 285 मीटर पूर्ण होईल तेव्हा सर्वाधिक उंचीची असेल. तूर्तास मुंबईत 300 मीटरवरच्या मजल्यांना परवानगी नाही. त्यामुळे पॅलेस रॉयलचेही वरचे मजले धोक्यात येऊ शकतात. या सर्व घडामोडी पाहून ओबेरॉयने थ्री सिक्स्टी वेस्ट 270 मीटरवरच आटोपती घेतली आहे.

Lodha World One Tower

उंचीवरुन लटकलेला लोढा वर्ल्ड वन टॉवर (फोटो क्रेडिट : फोर्बज)

 

हे सुद्धा वाचा : 

मंगल प्रभात लोढा यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आता तरी थांबा; मंगल प्रभात लोढांच्या उत्तरावर पिकला हशा

Exclusive : मंगलप्रभात लोढा परदेशी अधिकाऱ्याला म्हणाले; तुम्हाला शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर माहित आहेत का ?

लोढा वर्ल्ड वन का लटकलेय ?

मोठा गाजावाजा करून 2011 मध्ये वर्ल्ड वनचे बांधकाम सुरू झाले. 442 मीटर (1,450 फूट) इतका उंच टॉवर बांधण्याची योजना होती. मात्र, या उंचीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (एअरपोर्ट ऑथरिटी) मान्यता मिळवण्यात अपयश आल्याने हा प्रकल्प काही वर्षे रखडला होता. नोव्हेंबर 2015 मध्ये, लोढा यांनी 285.06 मीटर ते 454 मीटर उंचीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे वारंवार विनंती केली. मात्र, त्यांना नकार मिळाला. उंचीच्या मंजुरीसाठी यापुढे कोणत्याही याचिकांवर विचार केला जाणार नाही, असे त्यांना सांगितले गेले होते. तरीही लोढा उंची पूर्ण करण्याबाबत फारच अतिआत्मविश्वासात होते. शेवटी मोठ्या विलंबानंतर, या प्रकल्पाची सध्याच्या उंचीवर पुनर्रचना करण्यात आली आहे. काही सूत्रांच्या मते, वर्ल्ड वन टॉवरने 95 मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण केले आहे. भारताच्या विमानतळ प्राधिकरणाने घेतलेल्या उंचीच्या आक्षेपाचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. दरम्यानच्या काळात इमारतीत इंटीरियरचे काम चालू राहिले. वर्ल्ड क्रेस्ट खालच्या स्लॅबपासून ताब्यात घेण्यासाठी तयार झाले. त्याच वेळी वर्ल्ड व्ह्यूच्या तिसऱ्या टॉवरचे बांधकामही सुरू झाले.

लोढांना जमले नाही ते ब्रिटनच्या कंपनीने कसे जमवले ?

भारताचा नंबर 1 रिअल इस्टेट डेव्हलपर ग्रुप असा दावा करणाऱ्या लोढा समूहाचा वर्ल्ड वन प्रोजेक्ट उंचीवरुन लटकलेला असताना ब्रिटनमधील कंपनीने केलेल्या घोषणेबाबत भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मध्यंतरी लोढा समूह ब्रिटनमध्ये दिवाळखोरीच्या स्थितीत होता. वर्ल्ड वन प्रकल्प अडकल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. तत्पूर्वी, ट्रम्प-ट्रिबेका डेव्हलपर्सने 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक योजना जाहीर केली होती. त्यांनी लोढा समूहाशी करारही केला होता. मात्र, हे बांधकाम लटकले. त्या अगोदरच मुदतीत ट्रम्प टॉवर उभे राहिले. लोढा यांच्या उंचीच्या अवास्तव महत्त्वाकांक्षेमुळे अनेक उच्चभ्रू खरेदीदार आणि गुंतवणूकदारही बेजार झाले. आवश्यक वैधानिक परवानग्या न घेता हेतुपुरस्सर फसवणुकीच्या तक्रारी काही खरेदीदारांनी महारेराकडे केल्या. दरम्यानच्या काळात, बिर्ला समूहाने नियारा बिर्ला नियाराद्वारे मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. सॅम्पल फ्लॅट तयार नसूनही, आकार लहान व कमी ‘लक्झरी’ असूनही समुद्राच्या अधिक जवळ आणि स्वच्छ, पारदर्शी कार्यभार यामुळे कुंपणांवरचे ग्राहक, गुंतवणूकदार बिर्लाकडे आकर्षित होत आहेत. बिर्ला नियारा ब्लॉकबस्टर ठरू शकेल, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते. काही तज्ञांच्या मते, सध्या लोढा सत्तेच्या अगदी जवळ आहेत, मंत्री आहेत. ते काही चमत्कार करू शकतात. कदाचित, बाहेरच्या देशातील एसआरएएम आणि एमआरएएम ग्रुप आणण्यामागे काही स्थानिक शक्ती असू शकतील. परकीय ग्रुप मुंबईत एव्हढी मोठी हिंमत कशी करू शकेल? आधीच्या प्रोजेक्टमुळे प्रतिमेला झालेले नुकसान, दुखावलेले गुंतवणूकदार-ग्राहक हे सर्व लक्षात घेता, हा मागच्या दारचा मार्ग असू शकतो, अशी चर्चाही रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू आहे.

Indias Tallest Building, Lodha World One Tower, srammram group

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी