34 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरमुंबईनवी मुंबईकरांवर किती अन्याय करणार?

नवी मुंबईकरांवर किती अन्याय करणार?

एकविसाव्या शतकातील शहर असं बिरुद मिरवणाऱ्या नवी मुंबईतील रहिवाशांवर सरकार किती अन्याय करणार, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याला निमित्त ठरलं आहे ते नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) प्रकल्पाचं. नवी मुंबई मेट्रो प्रत्यक्षात केव्हा धावेल, नवी मुंबईकरांचा प्रवास सोपा कधी होईल, खासगी वाहनांच्या लुटीतून नवी मुंबईकरांची कधी सुटका होईल, असे एक ना अनेक प्रश्न नवी मुंबईकर सरकारला विचारत आहेत. पण नवी मुंबईकरांची दखल ना सिडको प्रशासन घेत आहे ना महायुती सरकार. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा एवढंच नवी मुंबईकरांच्या हाती आता उरलं आहे.

नवी मुंबईची मेट्रोचं उद्घाटन ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते होणार होतं. पण पंतप्रधान मोदींना वेळ न मिळाल्यामुळे उद्घाटन (inauguration) झालंच नाही. या उद्घाटनासाठी मोठा इव्हेंट करण्यात येणार होता. त्यासाठी सिडकोने ५ कोटींचं टेंडरदेखील काढलं होतं. यंदा १९ जानेवारीला पंतप्रधान मोदींनी मुंबईतील मेट्रो-२ए आणि मेट्रो-७ चे उद्घाटन केलं होतं. त्यावेळी नवी मुंबई मेट्रोचंही उद्घाटन केलं जाईल, अशी चर्चा होती. त्यानंतरही अनेकवेळ नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनांच्या तारखा येत होत्या. प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं.


मुद्दा हा आहे की जर नवी मुंबईची (Navi Mumbai) मेट्रोचं काम पूर्ण आहे, तर उद्घाटन होत नाही म्हणून नवी मुंबईकरांनी हाल का सहन करायचे. वास्तविक १ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोच्या प्रकल्पाची पायाभरणी झाली. आता त्या घटनेला साडेबारा वर्षे झाली आहेत. एका पिढीचं शिक्षणदेखील पूर्ण झालं तरी मेट्रो अजूनही कारशेडमध्येच आहे. मेट्रो धावण्यास तयार असताना नवी मुंबईकरांनी भरमसाठ पैसे देऊन रिक्षानेच प्रवास करायचा का, असा सवाल खारघर, तळोजाचे रहिवासी करत आहेत.

नवी मुंबईतील मेट्रोचा प्रकल्प सीबीडी-बेलापूर ते तळोजातील पेंधर असा आहे. हा ११.१ किलोमीटर मेट्रोचा प्रकल्प २०१० मध्ये ३०० कोटींचा होता. आता प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात गेला आहे. एवढं होऊनसुद्धा उद्घाटन होत नाही. म्हणूनच हा नवी मुंबईकरांवर अन्याय नाही का, असा सवाल केला जात आहे.

वास्तविक नवी मुंबईत पहिल्यांदा ट्रेनची सेवा सुरू झाली त्यासाठी सिडकोनं (CIDCO) पुढाकार घेतला होता. वाशी ते पनवेलपर्यंतच्या रेल्वे प्रकल्पासाठी सिडकोनं मोठ्या खर्चाचा वाटा उचलला होता. पण तो खर्च वसुलीसाठी आजही नवी मुंबईकरांना ट्रेनच्या तिकीट तसेच पासमधून कर भरावा लागत आहे. या कराची वसुली १९९२ पासून केली जात आहे. सिडकोच्या रेल्वे प्रकल्पाच्या खर्चाची वसुली झाली की नाही,  हे नवी मुंबईकरांना कळवण्याची सिडको कधी तसदी घेत नाही. त्यामुळे हा भार नवी मुंबईकरांवर आहेच. त्यात आता उद्घाटनाअभावी रखडलेल्या मेट्रोमुळे नवी मुंबईकर आणखी संतप्त झाले आहेत.

तळोजा ते सीबीडी बेलापूर मेट्रो खारघरमधून धावणार असल्याने १२-१५ वर्षांपूर्वी हजारो लोकांनी खारघर, तळोजा परिसरात घरे घेतली. मेट्रोमुळे त्यांना घरांसाठी जास्त पैसे मोजावे लागले होते. पण त्यांच्यासाठी नवी मुंबई मेट्रो केवळ स्वप्नचं राहिलं आहे. आता तोंडाशी घास आला आहे, पण उद्घाटनाअभावी अडला आहे. वास्तविक डिसेंबर २०२१ मध्ये मेट्रो सुरू करण्याचे सिडकोचे प्रयत्न होते. पेंधर ते सेंट्रल पार्क अशी चाचणीही झाली होती. त्यावेळी मेट्रोच्या तिकीटाचेही दर जाहीर करण्यात आले होते.

मेट्रोचे तिकीट दर

२ किलोमीटरपर्यंत – १० रुपये
२ ते ४ किलोमीटरपर्यंत – १५ रुपये
४ ते ६ किलोमीटरपर्यंत – २० रुपये
६ ते ८ किलोमीटरपर्यंत – २५ रुपये
८ ते १० किलोमीटरपर्यंत – ३० रुपये

हे ही वाचा

राज ठाकरेंवरील तडीपारीचा गुन्हा रद्द

जावेद अख्तर यांनी मनसे दीपोत्सव कार्यक्रमात दिल्या ‘जय सिया राम’ च्या घोषणा

बनावट रॉयल्टी बूक छापून डंपर लॉबीचा सरकारला ‘इतक्या’ कोटींचा चुना

दरम्यान, नवी मुंबई मेट्रो लगेच सुरू करावी, यासाठी उद्धव ठाकरे गटाने स्वाक्षरी मोहीमदेखील सुरू केली आहे. किमान आतातरी मेट्रोचं उद्घाटन करा नाहीतर, दुखावलेले मतदार भविष्यात ईव्हीएममधून त्यांची नाराजी व्यक्त करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी