30 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
Homeमुंबईसावित्रीबाई मालिका बंद होण्यामागे राजकीय दबाव ?

सावित्रीबाई मालिका बंद होण्यामागे राजकीय दबाव ?

अतुल माने, जेष्ठ पत्रकार

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई (Savitribai) यांच्या जीवनावरील बहुचर्चित ‘ सावित्रीबाई ‘ ही मालिका अर्ध्यातून बंद करण्यामागे विशिष्ट विचारसरणी आणि राजकीय दबाव तंत्र असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. प्रेक्षक वर्गाचा कमी प्रतिसाद म्हणजे टीआरपी कमी असल्याचे कारण हे केवळ निमित्त मात्र असल्याची जोरदार चर्चा सध्या समाज माध्यमातून सुरू आहे.

सोनी मराठी वाहिनीवर सावित्रीबाई ही मालिका दाखविण्यात येत आहे. पण आता अचानक 26 डिसेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग दाखवून ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनी ने घेतला आहे. या मालिकेला पुरेसा टी आरपी नसल्याने ती बंद करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या निर्णयामुळे फुले प्रेमी बहुजन समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून याबाबतचा असंतोष समाज माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

या मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका आश्विनी कासार तर जोतिबा फुले ही भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहे. मालिका बंद होत असल्याने आपणास धक्का बसल्याची प्रतिक्रिया आश्विनी ने व्यक्त करतानाच यापुढे ऐतिहासिक आणि थोर काम केलेल्या व्यक्तींची माहिती अशा पद्धतीने जर येणार नसेल तर ते समाज व्यवस्थेला धोकादायक आहे, असेही आश्विनी ने सांगितले. या मालिकेच्या संशोधन मधील एक प्रमुख घटक असलेल्या प्रा. हरी नरके यांनी ही खेद व्यक्त करताना टीआरपी की अन्य कोणते कारण यामागे आहे हे सुजाण प्रेक्षकांनी शोधावे असे आवाहन केले आहे.

दरम्यान या मालिकेला राजाश्रय देऊन ती बंद करू नका अशी मागणी मंत्री छगन भुजबळ तसेच नितीन राऊत यांनी केली आहे. मालिका समाप्ती चा निर्णय हा एखाद्या मालिकेला मिळणारी प्रेक्षक पसंती ठरवते, कमी प्रतिसादामुळे आम्हाला ही मालिका दाखवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे वाहिनी च्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.

दरम्यान या पूर्वीही झी मराठी वाहिनीवर असलेली छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावरील मालिका बंद करण्याचा घाट घातला गेला होता. पण नंतर समाज माध्यमातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिये नंतर ही मालिका कायम दाखविण्यात आली. आता सुद्धा हीच राजकीय विचार सरणी सावित्रीबाई यांच्या वरील मालिका बंद करण्यामागे आहे. ही मालिका कोणत्याही स्थितीत बंद करण्यात येऊ नये यासाठी सध्या समाजमाध्यमातून एक मोहीम राबविली जात आहे.

राज्यातील महाविकास आघाडी चे सरकार या मालिकेला राजाश्रय देते की नाही यावर सर्व अवलंबून आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी