26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमुंबईगरीब मराठ्यांसाठी तुमचं असणं अपरिहार्य..असे जरांगेंना का म्हणाले प्रकाश आंबेडकर

गरीब मराठ्यांसाठी तुमचं असणं अपरिहार्य..असे जरांगेंना का म्हणाले प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी सहावा दिवस. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. ही सार्वत्रिक चिंतेची बाब झालेली असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना खुले पत्र लिहिले आहे. ‘गरीब मराठ्यांचे आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दुरवस्था यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जे सोडवणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे.’ असे कळकळीचे आवाहन आंबेडकर यांनी या पत्रात केले आहे.

गरीब आणि रयतेच्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपण पुढाकार घेऊन मोठं आंदोलन उभं केलं आणि प्रस्थापित निजामी मराठा नेतृत्वाच्या विरोधात समाजात जागृती निर्माण केली आहे. 2014 नंतर मनुस्मृती मानणाऱ्या व्यवस्थेची गढी दुर्दैवाने देशात आणि राज्यात सत्तेत आली आहे, आणि या सत्तेच्या विरोधात कुणी आवाज बुलंद केला तर त्यांचे मानसिक, सामाजिक, राजकीय खच्चीकरण करून जाती जातीत भांडण लावून देण्यात येते.  हे थांबवणे गरजेचे आहे.

आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शोषणाविरुद्ध लढा उभा करीत आहात आणि त्यासाठी तुमचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. समाजात लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणारेच राहिले नाहीत तर त्यांची बाजू कोण घेणार? गरीब, रयतेच्या मराठ्यांना आपला फार मोठा आधार वाटत आहे त्यामुळे आपण स्वतःचा जीव सांभाळावा असे मी आपणास आवाहन करतो. असेही आंबेडकर म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी करणारे गरीब मराठे आणि ही मागणी पूर्ण करू शकणारे सत्ताधारी निजामी मराठे असे दोन्ही बाजूने मराठे असूनही गरीब मराठ्यांची मागणी पूर्ण होत नाहीय. सत्ता काँग्रेसची असो, भाजपची असो किंवा राष्ट्रवादीची असो यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिले नाही. उलट सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतावर स्वतःच्या संपत्तीत आणि सत्तेत निरंतर वाढच केलेली आपल्याला दिसते.

आपण पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आंदोलन व लोक जागृतीद्वारे या विषयावर गांभीर्य निर्माण केले आहे. परंतु दुर्दैवाने  सत्ताधारी राज्यकर्ते अतिशय निर्दयी होऊन आपल्या आमरण उपोषणाला दुर्लक्षित करीत आहेत. वर्तमानातील या सत्तेला मानवीय चेहरा नाहीय असेच म्हणावे लागत आहे. आज  अनेक मराठा तरुण या निराशेतून आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या कडेही सध्याचे 3 पक्षाचे  सत्ताधारी राज्यकर्ते दुर्लक्ष करतांना उभा महाराष्ट्र बघत आहे. असेही ते म्हणाले.

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे येऊन गेले. परंतू त्यांनीदेखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा साधा उल्लेख देखील केला नाही. या पूर्वीच्या राज्यकर्त्यां प्रमाणेच वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकार यांची भूमिका देखील ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच आहे. त्यामुळे  आता आंदोलन करत रहाणे ही काळाची गरज आहे. यासाठी  आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे. आपण पाणीसुध्दा घेत नाही ही चांगली गोष्ट नाही. आपण किमान नारळाचे पाणी तरी घ्यावे. वंचित बहुजन आघाडी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडून गेलेल्या आमदार व खासदारांच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन होत नाही तोपर्यंत केंद्र व राज्यशासन हा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही, आणि ते जागेवरून हलणार देखील नाही. या संदर्भात आम्ही आपल्याला हे सुचवत आहोत की मराठा आरक्षणाची तीव्रता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून निवडून गेलेले जे खासदार  आणि आमदार आहेत त्यांच्या घरा समोर निदर्शने करावी  तरच ते जागेहून हलतील. त्यामुळे आपण  या उपोषणाला त्या दृष्टीने  योग्य वळण द्यावे अशी विनंती आम्ही आपल्याला करीत आहोत. असेही आंबेडकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा 

राजीनामे देणारे आमदार-खासदार जरांगेंचे ऐकणार का?
‘सरकारमधील लोक खोटे बोलण्यात पटाईत,’ नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात
जरांगे-पाटील म्हणाले, मैं खपाखप बोलता, घोडे लगाता…

या अकार्यक्षम सरकारच्या विरोधात आपला जीव धोक्यात न घालता येत्या निवडणुकीत याच सरकारमधील किंवा सर्वच पक्षांमधील  आमदार, खासदार, मंत्री यांना सत्तेतून खाली कसे उतरवता येईल, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. गरीब मराठ्यांचे आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दुरवस्था यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जे सोडवणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे. पुन्हा एकवेळ आवाहन करतो की आपण स्वतःचा जीव सांभाळावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी