32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeमुंबईMetro Car shed : फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने गुंडाळला,...

Metro Car shed : फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने गुंडाळला, मेट्रो कारशेड आरे ऐवजी आता कांजुरमार्गमध्ये होणार : मुख्यमंत्री

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील आरे कारशेडबाबत (Metro Car shed) देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केला आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचे घोषित करत, मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गमध्ये उभारण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

https://www.facebook.com/1426708644212112/videos/2836347583289494

उद्धव ठाकरे यांनी आरेमधील ८०० एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. ‘आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचे काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आरेच्या जंगलात या कारशेड प्रकल्पासाठी जी इमारत बांधण्यात आली आहे, ती दुस-या कामासाठी वापरण्यात येईल. जवळपास १०० कोटी रुपये खर्च झाला आहे, तो पैसा वाया जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या परिसरात स्थायिक असलेल्या आदिवासींच्या पाड्यांवर कुठलीही गदा येणार नाही. आरेच्या जंगलातील जैवविविधतेचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

त्याचबरोबर, मेट्रो कारशेडला आम्ही विरोध केला होता. पर्यावरण प्रेमींनीही विरोध केला होता. मेट्रो कारशेड रद्द करण्यासाठी अनेक आंदोलने झाली होती. यात अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. व्हेंटिलेटर आता उपलब्ध होत आहे. पण कोरोना हा पसरत चाललेला आहे. कोरोनाचे रुग्ण आता ग्रामीण भागात वाढत चालले आहेत. काही जणांना कोरोना होऊन गेला असेल. तर काही जणांना सौम्य लक्षणे जाणवत आहेत. पण, कोरोना सध्या मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी संघर्षमय ठरत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

लॉकडाऊनच्या काळात सर्व धर्मियांनी सण हे खबरदारी घेऊन साजरे केले आहे. आता नवरात्र, दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे हळुहळू आपण दारे उघडत आहोत. उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे, नाहीतर कोरोना आला तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

कृषी विधेयकाचा निर्णय चर्चा करून घेणार

आम्ही जे करू जनतेच्या हितासाठी करू, जो काही शेतकरी कायदा आला आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या संघटना आणि लोकांशी बोलणे सुरू आहे. त्यानंतरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. आला कायदा आणि केली अंमलबाजवणी असे होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी कृषी कायद्याबद्दल स्पष्ट केले आहे.

मंदिरे, लोकल, जिम बंदच राहणार

काही महिन्यांपासून लोकल, मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर लोकल सेवा सुरु होऊ शकते, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल काही निर्णय जाहीर करतात, याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. पण लोकल, मंदिर आणि जीम इतक्यात सुरु होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मला गर्दी नकोय. मुंबईत इतक्यात तरी लोकल पूर्ण क्षमतेने सुरु होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देऊ असे त्यांनी सांगितले. पण लॉकडाऊनपूर्वी जशी लोकल सेवा सुरु होती, तशी लोकल सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली आखून देऊ असे ते म्हणाले.

कांजूरमार्गची जमीन कोर्ट कचेरीत फसलेली : भातखळकर

मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आता कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर कांदिवली पूर्वचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे. ‘मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकचेरीत अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला? असा सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र-मुंबईतील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की, त्यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या समितीनेच मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आरे कॉलनीच्या जागेवरच होऊ शकते असे म्हटले होते, त्याशिवाय आमच्या सरकारच्या काळात नियुक्त केलेल्या समितीने सुद्धा कारशेडसाठी आरे कॉलनीची निवड केली होती, असे भातखळकर म्हणाले.

कारशेड कांजूरमार्गला नेल्यास ५ हजार कोटींचा भुर्दंड : सोमय्या

मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल ५ हजार कोटी रुपयांनी वाढेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. भाजप सरकारच्या काळात आरेतील मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. या प्रकल्पाची किंमत ५ हजार कोटींनी वाढेल. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी पाच वर्षे लागतील. कारशेड कांजूरमध्ये गेल्यामुळे आता मेट्रो ट्रेनच्या पार्किंगसाठी रोज आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल. त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठीच्या खर्चातही वाढ होईल. तसेच सरकारने कारशेडसाठी निवडलेली कांजूरमार्गची जमीन नेमकी आहे तरी कुठे? मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का उच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असलेल्या जमिनीवर? या जमिनीसाठी सरकारला २ हजार कोटी डिपॉझिट करावे लागतील. परंतु, मुख्यमंत्री ही गोष्ट लपवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी