27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईBMC : कामावर झोपी गेलेल्यांचे चित्रीकरण करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या विरोधात युनियन उभी

BMC : कामावर झोपी गेलेल्यांचे चित्रीकरण करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या विरोधात युनियन उभी

महिला सुरक्षाकर्मीच्या खोली मध्ये घुसून सुरक्षा अधिकाऱ्याने चित्रीकरण करणे निषेधार्थ असून सुरक्षाकर्मींचे चित्रीकरण करताना त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करणेही तितकेच अन्यायकारक असल्याचे मत दि म्युनिसिपल युनियनचे आहे. दरम्यान, ड्युटीवर झोपा काढणे योग्य नसून याबाबत त्या सुरक्षा अधिकाऱ्याने चित्रीकरण करून व्हाट्सएपग्रुप द्वारे सुरक्षा अधिकाऱ्यांना कळविणे, हा काही गुन्हा होत नाही, असे मत सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अंगावर चादर घेऊन झोपी जात राम भरोसे सुरक्षा व्यवस्था ठेवणाऱ्या मनपा सुरक्षाकर्मींचे चित्रीकरण करून सुरक्षा रक्षकांच्या व्हाॅट्सअपग्रुप वर एका सुरक्षा अधिकाऱ्याने पोस्ट केले होते. ही घटना मागील महिन्यात घडली होती. आता त्या सुरक्षारक्षक अधिकाऱ्याच्या विरोधात युनियन उभी राहिली आहे. महिला सुरक्षाकर्मीच्या खोलीमध्ये घुसून सुरक्षा अधिकाऱ्याने चित्रीकरण करणे निषेधार्थ असून सुरक्षाकर्मींचे चित्रीकरण करताना त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करणेही तितकेच अन्यायकारक असल्याचे मत दि म्युनिसिपल युनियनचे आहे.

मुंबईला (BMC) सात धरणांतून दररोज 3 हजार 800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यात 2100 दशलक्ष लिटर पाण्यावर पिसे-पांजरापूर केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. येथून पुढे मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत असणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेसही डोळ्यात तेल घालून पहारा देणे आवश्यक असते. पण येथे मागील महिन्यात एका सुरक्षा अधिकाऱ्याने रात्री 1 वाजता अचानक धाड टाकली असता मुंबई महापालिकेचे सुरक्षाकर्मी अंगावर चादर गोधड्या घेऊन झोपी जात राम भरोसे सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. एकूण 18 सुरक्षाकर्मी झोपी गेलेले होते. यामध्ये 14 पुरुष आणि 4 महिला सुरक्षाकर्मींचा समावेश होतो. ही घटना सुरक्षा अधिकाऱ्याने चित्रीकरण करून मनपा सुरक्षा रक्षकांच्या व्हाट्सएपग्रुप वर पोस्ट केले. ही पोस्ट सगळीकडे पसरली असून यामुळे महिला सुरक्षाकर्मींची नाहक बदनामी होत आहे, असे मत युनियनने प्रकट केले आहे.

दरम्यान, सुरक्षाकर्मीं झोपी गेल्याचे चित्रीकरण करताना त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणेही योग्य नसल्याची खंत दि म्युनिसिपल युनियनने व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेत सध्य स्थितीत 2 हजार पुरुष आणि महिला सुरक्षाकर्मी कार्यरत असून 1700 सुरक्षाकर्मींची जागा रिक्त आहेत. संपूर्ण 8 तासांच्या पाळीत सुरक्षा रक्षकांकरिता विश्रांतीची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. ड्युटीवर असताना सुरक्षारक्षकांना त्यांच्या नैसर्गिक विधी-गरजांसाठी मोकळीक देण्यासाठी मनुष्यबळाची तरतूद करण्यात आलेली नाही. पुरुष व महिला सुरक्षा रक्षकांना सर्व सुविधायुक्त स्वतंत्र विश्रांतीगृह वा चौकीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सुरक्षाकर्मीना देण्यात आलेले बूट निकृष्ट दर्जाचे असून ते दोन दिवसात फाटतात. मागील तीन वर्षांपासून बूट देण्यात आलेले नाहीत. बूट घातले नाही म्हणून दंड मात्र आकारला जातो. सुरक्षाकर्मींना तीन वर्षे बूट ही देण्यात आलेले नाहीत, असे दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

PWD : पीडब्ल्यूडीतील ‘बदली’ घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

Mobile Charger : मोबाईल चार्जर देखील करु शकतो तुमचे बँक खाते रिकामे

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

दरम्यान, ड्युटीवर झोपा काढणे योग्य नसून याबाबत त्या सुरक्षा अधिकाऱ्याने चित्रीकरण करून व्हाट्सएपग्रुपद्वारे सुरक्षा अधिकाऱ्यांना कळविणे, हा काही गुन्हा होत नाही, असे मत सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे संबंधित प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी विरोधात कारवाई करण्यात यावी. अन्यथा संबंधित प्रकरणाची राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात येईल, असे बने यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सह आयुक्त यांना लेखी तक्रार पत्रात नमूद केलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी