29 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरमुंबईएकदाचे आंबेडकरी अनुयायांना दादर बंदीचे आदेशच काढा, म्हणजे आपला जीव शांत होईल...

एकदाचे आंबेडकरी अनुयायांना दादर बंदीचे आदेशच काढा, म्हणजे आपला जीव शांत होईल : अ‍ॅड. विश्वास काश्यप

महापरिनिर्वाणदिनासाठी मोठ्यासंख्येने येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी दादर स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी परिपत्रक काढून सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना केल्या आहेत. मात्र या उपाययोजना भीम अनुयायांसाठी जाचक अत्याचारच असल्याचा आरोप माजी पोलीस अधिकारी अॅड. विश्वास काश्यप यांनी केला असून लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद यांना पत्रच लिहीले आहे.

मुंबईत 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून मोठ्यासंख्येने आंबेडकरी अनुयायी दरवर्षी येत असतात. महापरिनिर्वाणदिनासाठी मोठ्यासंख्येने येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी दादर स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी परिपत्रक काढून सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना केल्या आहेत. मात्र या उपाययोजना भीम अनुयायांसाठी जाचक अत्याचारच असल्याचा आरोप माजी पोलीस अधिकारी अॅड. विश्वास काश्यप यांनी केला असून लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद यांना पत्रच लिहीले आहे. एकदाचे आंबेडकरी अनुयायांना दादर बंदीचे आदेशच काढा, म्हणजे आपला जीव शांत होईल, असे देखील अॅड. काश्यप यांनी म्हटले आहे. अॅड. काश्यप यांनी लिहिलेले पत्र खाली जसेच्या तसे देत आहोत.

प्रती,
माननीय श्री कैसर खालिद साहेब,
पोलीस आयुक्त,
लोहमार्ग,
मुंबई.
महोदय,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या दिवशी सर्व जाती धर्माचे लाखो भीम अनुयायी दादर चैत्यभूमीला भेट देत असतात हे आपणास माहीत असेल ही अपेक्षा बाळगतो.
बाबासाहेबांच्या प्रति असलेली अतिउच्च प्रतीची निष्ठा बाळगून त्यांचे अनुयायी मिळेल त्या मार्गाने दादर चैत्यभूमीला येत असतात. देशाच्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जनता येत असते. या जनतेच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे आणि उपाययोजना करणे रेल्वे पोलिसांचे कर्तव्यच आहे. परंतु रेल्वे पोलिसांचे कर्तव्य म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी भीम अनुयायांसाठी जाचक अत्याचारच ठरत आहे.
पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग, मुंबई यांनी जी प्रेस नोट काढलेली आहे, त्यानुसार दादर रेल्वे स्थानकात कशाप्रकारे अराजकता तयार होईल, आणि संपूर्ण भीम अनुयायांनाच कसे बदनाम करता येईल, अशा प्रकारच्या अनाकलनीय अप्रत्यक्ष सूचना वजा आदेश आपल्या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. सुरक्षिततेच्या नावाखाली जो छळ आपण केला आहे, करणार आहात याबद्दल आपल्या बुद्धी चातुर्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
गेल्या वर्षी ५ आणि ६ डिसेंबर २०२१ मध्ये भीम अनुयायांचा आपण अशाच प्रकारे छळ केला होता. जागोजागी भल्या मोठ्या जाड रश्या लावून, लोकांना वेगवेगळ्या गेटमधून नो एन्ट्री करून तुम्ही कोणत्या प्रकारची सुरक्षितता केली होती हे आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला आणि भीम अनुयायांना काही समजलेच नाही.
आपली गेल्या वर्षीची तथाकथित दादर रेल्वे स्थानक सुरक्षितता सामान्य जनतेच्या दृष्टीने छळ छावणी होती. आपण दिलेल्या आदेशानुसार आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी असा काही ” चोख बंदोबस्त” लावला होता की तो बंदोबस्त भीम अनुयायांसाठी होता की पाकिस्तानी अतिरेक्यांसाठी होता हेच कळत नव्हते.
साहेब, चैत्यभूमीला येणारी जनता गरीब आहे हो. मुंबई बाहेरील लोकांना दादर ईस्ट आणि वेस्ट चा फरक सुद्धा कळत नाही. ही मंडळी काय गडबड करणार ? सुरक्षिततेच्या नावाखाली तुम्ही त्यांना कसेही वागवणार का ? आपल्या हातात अमर्याद अधिकार आहेत म्हणून काहीतरी व्यवहारशून्य नियोजन करावयाचे आणि स्वतःच आपली पाठ कौतुकाने थोपटून घ्यावयाची असे काही आहे का ?
महोदय, मी दादरकर आहे. दादर रेल्वे स्थानकात दररोजच लाखो प्रवाशांचे येणे जाणे असते. दादरला गर्दी नवी नाही. लाखोंची गर्दी असून सुद्धा व्यवस्थित दिनक्रम चाललेला असतो. तुमच्यासारख्यांनी उगाचच सुरक्षिततेच्या नावाचा बागलबुवा उभा करून काहीही करावे आणि ते जनतेने सहन करावे असे आपणास वाटते का ? याचा आपण कृपया गांभीर्यपूर्वक विचार करावा.
महोदय, आपणास नम्र विनंती आहे की ५ आणि ६ डिसेंबर साठी केलेली तथाकथित उपायोजना आपण ताबडतोब गुंडाळून ठेवावी. दररोज ज्याप्रमाणे लोकं ये जा करतात त्याप्रमाणे त्यांना ये जा करण्यासाठी मोकळीक द्यावी.
आपला विश्वासू,
अॅड. विश्वास काश्यप,
माजी पोलीस अधिकारी,
दादर, मुंबई.

ताजा कलम :-
साहेब, तुम्ही पुढच्या सहा डिसेंबर पर्यंत मुंबई लोहमार्ग आयुक्त नसाल कारण आपली बदली दुसरीकडे कुठेतरी झालेली असेल. परंतु आपण सुरक्षिततेच्या नावाखाली लावलेला हा बंदोबस्त भविष्यातसुद्धा असाच लावला जाईल. कारण तुमच्या जागी येणारे नवीन आयुक्त तुम्ही तयार केलेल्या बंदोबस्ताचीच फाईल पुढे घेऊन तीच परंपरा पुढे चालवतील. या फाईल परंपरेचाच फार मोठा भविष्यकालीन धोका आहे साहेब.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!